निविदेच्या वादाला नवे वळण

निविदेच्या वादाला नवे वळण
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : महापालिकेतील निविदा प्रक्रियेवरून सुरू झालेला वाद आता थेट प्रशासनाच्या कामकाजावर येऊन ठेपला आहे. कार्यकारी अभियंता रणधीर राणे यांना नगरसेवक राजेंद्र फाटक यांनी ‘चोर’ आणि ‘भ्रष्ट अधिकारी’ संबोधल्याच्या निषेधार्थ महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आज (ता. ६) लेखणी बंद आंदोलनाचे हत्यार उपसले. या आंदोलनामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, निविदेचा वाद आता नगरसेवक विरुद्ध अधिकारी अशा संघर्षाच्या वळणावर पोहोचला आहे.

ठाणे पालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता राणे आणि नगरसेवक फाटक यांच्यात काही दिवसांपूर्वी निविदेवरून खडाजंगी झाली होती. महासभेत संबंधित निविदेला विरोध झालेला असतानाही प्रशासनाने ते खुले केल्याचा आक्षेप फाटक यांनी घेतला होता. त्यातून त्यांनी नगर अभियंता, तसेच राणे यांच्यावर निविदा प्रक्रियेत ‘मॅच फिक्सिंग’ आणि भागीदारीचे गंभीर आरोप केले.

काही निविदेमध्ये पाच टक्के कमिशन मागितल्याचा कथित आरोपही करण्यात आल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या आरोपांमुळे वाद आणखी चिघळला. राणे यांनी मात्र आरोप फेटाळून लावत सर्व प्रक्रिया नियमांनुसारच राबविल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर फाटक यांनी कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांवर केलेल्या टीकेत राणे यांना ‘चोर’ आणि ‘भ्रष्ट अधिकारी’ संबोधल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संयम सुटला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर आयुक्त सौरभ राव यांच्याकडेही निवेदन देण्यात आले आहे.

पालिकेत ‘कामबंद’ची ठिणगी
अधिकाऱ्यांचा अशा पद्धतीने अपमान करण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेत विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद ठेवत आपला संताप व्यक्त केला.

Marathi News Esakal
www.esakal.com