अबब... १७१७ सेस इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट; १७८ अतिधोकादायक!

अबब... १७१७ सेस इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट; १७८ अतिधोकादायक!
Published on: 

मुंबईतील १७८ सेस इमारती अतिधोकादायक
१,७१७ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट; म्हाडाकडून भूसंपादनाची कार्यवाही सुरू

बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईतील आठ-दहा दशके जुन्या असलेल्या उपकरप्राप्त (सेस) इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मोहीम म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने उघडली आहे. १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत १,७१७ इमारतींचे ऑडिट पूर्ण झाले. त्यापैकी तब्बल १७८ इमारती अतिधोकादायक, तर ३३३ इमारती धोकादायक ठरल्या आहेत. त्यापैकी अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे मोठे आव्हान म्हाडासमोर असणार आहे.
मुंबई शहरात १२ हजार ५५२ सेस इमारती असून, या इमारतींच्या दुरुस्तीची जबाबदारी म्हाडावर आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडा जीर्ण झालेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जात आहे. त्या अतिधोकादायक असल्याचे आढळ्यास रिकाम्या केल्या जातात. सेस इमारती आठ-दहा दशके जुन्या झाल्याने त्या कोसळून अपघात घडू नये, म्हणून म्हाडाच्या मुंबईत इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने चार एजन्सींच्या माध्यमातून १ सप्टेंबरपासून सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार गेल्या महिनाभरात जवळपास १,९६७ इमारतींचे ऑडिट पूर्ण झाले असून, १,७१७ इमारतींचा अहवाल आला आहे. त्यामध्ये १७८ इमारती अतिधोकादायक आढळल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच उर्वरित इमारतींचे ऑडिट सुरू असून, त्यातही अनेक इमारती अतिधोकादायक आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही अपघात घडू नये, म्हणून कलम ८८ (३) (अ) नुसार या इमारतींचे भूसंपादन करण्याची कार्यवाही म्हाडाने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
---
पर्यायी व्यवस्थेचे आव्हान
डिसेंबर २०२७ पर्यंत सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्यामुळे अतिधोकादायक ठरणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. एवढ्या मोठ्या संक्रमण सदनिका कशा उपलब्ध करणार, हा प्रश्न म्हाडासमोर उभा राहण्याची शक्यता आहे.
---
ग्राफिक्स
सेस इमारतींची संख्या - १२,५५२
स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण - १,९७६
अहवाल प्राप्त झालेल्या इमारती - १,७१७
अतिधोकादायक इमारती - १७८
धोकादायक - ३३३
रिकाम्या न करता दुरुस्ती करता येणाऱ्या इमारती - १,०८९
किरकोळ दुरुस्ती कराव्या लागणाऱ्या इमारती - ११७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com