

जीटीबीनगर पुनर्विकास प्रकल्प;
१ नोव्हेंबरपासून पात्र रहिवाशांना भाडे
१,२०० निवासी सदनिकाधारकांना दरमहा २० हजार रुपये मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : म्हाडातर्फे बांधकाम व विकास करार (सी ॲण्ड डीए) अंतर्गत जीटीबीनगरचा पुनर्विकास केला जात आहे. त्यानुसार पुनर्विकास प्रकल्पातील निष्कासित १,२०० पात्र निवासी सदनिकाधारकांना १ नोव्हेंबरपासून दरमहा २० हजार रुपये भाडे दिले जाणार आहे. तसेच पात्र ठरलेल्या १२१ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांना दरमहा १० हजार रुपये भाडे मिळणार असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.
शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या गुरू तेग बहादूरनगर (जी.टी.बी.नगर) समूह पुनर्विकास प्रकल्प हा म्हाडाचा पहिला सी ॲण्ड डीए तत्त्वावरील पुनर्विकास प्रकल्प आहे. या प्रकल्पातील गाळेधारक व झोपडीधारकांच्या पात्र-अपात्रतेची प्रक्रिया राबविण्यात येत असून, म्हाडाने ३५६ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांसाठी सुधारित प्रारूप परिशिष्ट-२ प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ३५६ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांपैकी १२१ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारक पूर्णपणे पात्र, १९६ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारक सशर्त पात्र ठरले. त्यांना सहा महिन्यांचे भाडे दिले जाणार, असल्याचे संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
सशर्त पात्र ठरलेल्यांना सहा महिन्यांची मुदत
सशर्त पात्र ठरलेल्या गाळेधारकांना आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी पुढील सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पात्रता सिद्ध करणे संबंधित धारकांसाठी बंधनकारक राहणार आहे. सदर कागदपत्रांची छाननी व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम पात्रतेबाबत निर्णय घेण्यात येईल. याशिवाय म्हाडाच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेसाठी संबंधित गाळेधारकांनी बेस्टच्या प्रलंबित वीजदेयकांची पूर्तता करणेदेखील आवश्यक आहे.
तीन निवासी टाॅवर ३९ ते ४८ मजले
पुनर्विकासाअंतर्गत १,२०० लाभार्थ्यांकरिता तीन आधुनिक व आकर्षक निवासी टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये ३९ ते ४८ मजल्यांच्या इमारती उभारण्याचे नियोजन आहे. विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) अन्वये फंजिबलसह किमान ४.५ चटई क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पातील लाभर्थ्यांना ६३५ चौरस फुटांची आधुनिक सोयोसुविधांयुक्त सदनिका विनामूल्य मिळणार आहे. गृहनिर्माण प्रकल्पाच्या बांधकामास प्राधिकृत प्राधिकरणाकडून बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सर्व पात्र रहिवासी लाभार्थ्यांना दरमहा २० हजार भाडे देण्यात येणार आहे.
म्हाडाकडे पाच वर्षे देखभाल
- प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी इमारतींची देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी म्हाडा घेणार आहे.
- प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र गेटेड कम्युनिटी संकल्पनेनुसार या प्रकल्पात पारंपरिक रॅम्पद्वारे प्रवेशयोग्य बहुमजली बेसमेंट व पोडियम स्तरांवर वाहनतळाची सोय करण्यात आली आहे.
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.