

५० किलोच्या गोणीचा तिढा कायम
कांदा-बटाटा मार्केट बंद न करण्याचे पणनमंत्र्यांचे निर्देश
जुईनगर, ता. ७ (बातमीदार) : एपीएमसीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये शेतमालाच्या गोणीसाठी ५० किलो वजनाची मर्यादा लागू करण्यावरून निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. यासंदर्भात पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या दालनात मंगळवारी (ता. ६) तब्बल दोन तास बैठक पार पडली. यातही ठोस निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, कांदा-बटाटा मार्केट कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देऊ नका, असे कडक निर्देश मंत्री जयकुमार रावल यांनी प्रशासनाला दिले आहेत.
याप्रसंगी माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार शरद सोनवणे, रवि पाटील, कांदा-बटाटा व्यापारी संघाचे संजय पिंगळे, राजू मणियार, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दाभोळे, पणन विभागाचे सचिव, पणन संचालक संजय कदम, एपीएमसीचे सचिव राजाराम धोंडकर यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत कांदा-बटाटा बाजारात येणाऱ्या शेतमालापैकी सुमारे ९० टक्के माल व्यापारी-ते-व्यापारी व्यवहारातून येत असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे मुंबईतील व्यापाऱ्यांनी ज्या व्यापाऱ्यांकडून कांदा-बटाटा मागविला जातो, त्यांना ५० किलोच्या आतच गोणींमध्ये माल भरून पाठविण्याच्या सूचना द्याव्यात, असे ठरविण्यात आले. राज्यातील तसेच परराज्यातील व्यापारी, शेतकरी आणि कामगारांनीही या नियमाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, दुष्काळी परिस्थिती आणि नियमनमुक्तीमुळे बाजार आवाराबाहेरील व्यापाराचे प्रमाण आधीच वाढले आहे. अशा परिस्थितीत ५० किलोच्या नियमाची अंमलबजावणी करताना शेतकरी, व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या भविष्यातील उत्पन्नावर होणारा परिणाम विचारात घ्यावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे पुढील दोन ते तीन महिन्यांचा कालावधी देऊन नियमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, तसेच आंदोलन स्थगित करून बाजारातील व्यवहार सुरळीत करावेत, अशी चर्चा झाली. मात्र, माथाडी कामगारांच्या हिताचा विचार करता पुढील दोन-तीन महिन्यांत ५० किलो वजनाच्या नियमाची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
व्यापाऱ्यांना नोटिसा आणि जनजागृती
बाजार बंद पडल्यास शेतकरी, व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज भासल्यास पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे आदेश रावल यांनी प्रशासनाला दिले. तसेच ५० किलो वजनाच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यासह प्रशासकीय पातळीवर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पणन संचालकांना देण्यात आल्या. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मुंबई बाजारात येणाऱ्या बटाट्याच्या तसेच नाशिक, पुणे आणि इतर भागांतून येणाऱ्या कांद्याच्या गोणी ५० किलोच्या आत भरून पाठविण्यासाठी संबंधित व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात येणार आहेत. यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती सचिव राजाराम धोंडकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.