

अधीक्षक वर्षानुवर्षे एकाच जागी!
दीर्घकाळच्या पदस्थापनेवर महासभेत प्रश्नचिन्ह
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : पनवेल पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधीक्षकांच्या पदस्थापनेचा मुद्दा महासभेत ऐरणीवर आला. महापालिकेच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण होत असताना काही कर्मचारी दीर्घकाळ एकाच प्रभागात कार्यरत असून, त्यांच्याकडे सातत्याने महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सोपविला जात असल्याबद्दल सत्ताधारी नगरसेवकांनीच मंगळवारी (ता. ७) प्रश्न उपस्थित केले.
अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवरील कारवाईपेक्षा ही कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या प्रभाग कार्यालयातील अधीक्षकांच्या दीर्घकाळाच्या पदस्थापनेवर आणि त्यांच्या उत्तरदायित्वावर महासभेत चर्चा झाली. माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी संबंधित अधीक्षकांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करीत निलंबनाची मागणी केल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
महापालिकेच्या सुरुवातीच्या काळात नगर परिषदेमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांकडे प्रभागस्तरीय जबाबदाऱ्या होत्या. मात्र, कालांतराने प्रभाग कार्यालयांतील पदभाराची रचना बदलली. ग्रामपंचायतींकडून महापालिकेत समाविष्ट झालेल्या काही कर्मचाऱ्यांकडे मोठ्या प्रशासकीय जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, त्यातील काही कर्मचारी आजही त्याच प्रभागात कार्यरत असल्याचा मुद्दा महासभेत मांडण्यात आला.
एकाच ठिकाणी दीर्घकाळ राहिल्याने स्थानिक पातळीवर प्रभाव निर्माण होतो का, तक्रारींची हाताळणी निष्पक्षपणे होते का आणि संबंधित अधिकाऱ्याच्या कामगिरीचे नियमित मूल्यमापन केले जाते का, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
खारघरमध्ये स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याकडे अनेक वर्षांपासून प्रभाग अधिकारी आणि त्यानंतर अधीक्षकपदाचा कार्यभार असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. कळंबोलीतही लिपिक संवर्गातील कर्मचारी अधीक्षक म्हणून दीर्घकाळ कार्यरत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. तक्रारींच्या संदर्भात तक्रारदाराचे नाव पुढे केले जात असल्याच्या तक्रारीही सभागृहात मांडण्यात आल्या.
त्यामुळे एखादा कर्मचारी किती काळ एकाच प्रभागात कार्यरत राहावा, बदली किंवा फेरपदस्थापनेचे निकष काय आणि तक्रारी असूनही पदभार कायम का ठेवला जातो, याचा खुलासा प्रशासनाला करावा लागणार आहे.
कामोठ्यातही अधीक्षकांच्या कामकाजावर ताशेरे
कामोठे-पनवेल परिसरातील अधीक्षक आणि प्रभाग अधिकाऱ्यांच्या कामकाजावरही सत्ताधारी नगरसेवकांनी महासभेत तीव्र आक्षेप नोंदविला. त्यामुळे हा प्रश्न एका प्रभागापुरता मर्यादित न राहता प्रभाग कार्यालयातील अधीक्षकांच्या एकूण कार्यपद्धतीपर्यंत पोहोचला आहे. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी अधिकारी कार्यरत असताना नागरिकांच्या तक्रारी कायम राहत असतील, तर संबंधित अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी करण्यात आली.
पदभार कायम; उत्तरदायित्व कुठे?
प्रभाग कार्यालयाचा कारभार नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांशी थेट जोडलेला असतो. त्यामुळे तेथे कार्यरत अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित असण्याबरोबरच त्याच्या कामाचे नियमित परीक्षण होणे आवश्यक असल्याचे मत महासभेत व्यक्त करण्यात आले.
परेश ठाकूर यांच्या मागणीने चर्चा तीव्र
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी संबंधित अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केल्याने महासभेतील चर्चा अधिक तीव्र झाली. सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधींनीच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.
महापालिकेच्या १० वर्षांच्या प्रवासात प्रभाग कार्यालयांची जबाबदारी कोणत्या पद्धतीने सोपविली जाते, अधिकारी-कर्मचारी एकाच ठिकाणी किती काळ राहतात आणि त्यांच्या कामाचे मूल्यमापन कशा पद्धतीने केले जाते, याचा फेरआढावा घेण्याची वेळ आली असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.