दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही खोल समुद्रात मासेमारी

दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही खोल समुद्रात मासेमारी
Published on: 

सॅटेलाइट फोन बंदच
लाखोंचा भुर्दंड; मच्छीमार संतप्त
उरण, ता. ७ (बातमीदार) : खोल समुद्रात संकटात सापडलेल्या मच्छीमारांना तातडीने किनाऱ्याशी संपर्क साधता यावा, यासाठी सुरू केलेली सॅटेलाइट फोन योजना प्रत्यक्षात मात्र कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. फोनचे वाटप होऊन आणि सेवा सुरू करण्याची घोषणा होऊन दोन महिने उलटले, तरीही सेवा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचा फोन आणि दरमहा सहा हजार रुपयांचा रिचार्ज करूनही संपर्काची सुविधा मिळत नसल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खोल समुद्रात मासेमारी करताना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, हवामान व सुरक्षा सूचना वेळेत मिळाव्यात आणि किनाऱ्याशी संपर्क कायम राहावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने मच्छीमारांसाठी सॅटेलाइट फोन योजना सुरू केली. मच्छीमारांची सुरक्षा प्रथम, या धोरणांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सरकारचा दावा आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाने भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) अधिकाऱ्यांशी चर्चा करून बीएसएनएल ग्लोबल सॅटेलाइट फोन सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर जुलै महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रायोगिक तत्त्वावर काही मच्छीमारांना सॅटेलाइट फोनचे वाटप करण्यात आले. १६ सप्टेंबरपासून आपत्कालीन सॅटेलाइट फोन सेवा सुरू होईल, असेही त्या वेळी स्पष्ट करण्यात आले होते.
सरकारच्या या घोषणेवर विश्वास ठेवून खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या शेकडो मच्छीमारांनी कर्ज, उधारी आणि उसनवारी करून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे फोन खरेदी केले. त्यासाठी दरमहा सहा हजार रुपये खर्च करून रिचार्जही करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील सुमारे २५ मच्छीमारांनी हे फोन घेतले असून, त्यापैकी १० ते १२ मच्छीमार करंजा-उरण परिसरातील असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.
मात्र, दोन महिने उलटूनही सेवा सुरू न झाल्याने मच्छीमारांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. करंजा येथील व्यावसायिक रोहन नाखवा यांनी सॅटेलाइट फोन सेवा अद्याप सुरू झालेली नसल्याची माहिती दिली.

मच्छीमारांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली संपर्क यंत्रणाच बंद असल्याने सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो रुपयांचा खर्च करूनही सेवा मिळत नसल्याने मच्छीमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कोट :
‘‘खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी आपत्कालीन परिस्थितीत बचावासाठी सुरू करण्यात आलेली सॅटेलाइट फोन सेवा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. याबाबत माहिती घेतली जात आहे.’’
- महेश देवरे, सहआयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com