महासभेत नागरी प्रश्नांसाठी स्वतंत्र वेळ?

महासभेत नागरी प्रश्नांसाठी स्वतंत्र वेळ?
Published on: 

भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी स्वतंत्र वेळ राखीव ठेवावा, अशी मागणी नगरसेविका स्नेहा पाटील आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल रेहमान ऊर्फ सद्दाम भाई खान यांनी केली आहे. पाटील यांनी नगरसेविकांसाठी स्वतंत्र बोलण्याचा वेळ निश्चित करण्याची मागणी केली आहे. तर, रेहमान यांनी महासभा सकाळी ११ वाजता घेऊन सुरुवातीचा किमान एक तास सर्वसाधारण चर्चेसाठी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे.

महापालिकेत ५० टक्के महिला नगरसेविका असून, त्यापैकी सुमारे ९० टक्के नगरसेविका प्रथमच निवडून आल्याचे स्नेहा पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी निवडून आल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. महासभेत शहराच्या विकासासह प्रभागातील नागरिकांच्या अडचणी आणि सार्वजनिक प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महासभेच्या विषयपत्रिकेवरील ठराव आणि निर्धारित विषयांमुळे अनेकदा सर्वसाधारण चर्चेसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे नगरसेवकांना प्रभागातील तातडीचे प्रश्न सभागृहात सविस्तरपणे मांडता येत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. महिला नगरसेविका महिला, बालक, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रश्न मांडत असल्याने त्यांना स्वतंत्र वेळ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
महासभा हा नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा महत्त्वाचा लोकशाही मंच असल्याने विषयपत्रिकेवरील विषय सुरू करण्यापूर्वी किमान एक तास प्रभागातील पाणी, रस्ते, आरोग्य आणि स्वच्छतेसह अन्य मूलभूत प्रश्नांवरील सर्वसाधारण चर्चेसाठी राखीव ठेवावा, अशी मागणी रेहमान यांनी केली आहे.

महासभा सकाळी घ्या
महासभेची वेळ सध्या दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास ठेवली जात असल्याने अनेकदा कामकाजाला वेळेची मर्यादा येते. त्यामुळे महासभा सकाळी ११ वाजता सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक सद्दाम भाई यांनी आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com