सेवानिवृत्त वृद्धाला ऑनलाइन लाखोंचा गंडा

सेवानिवृत्त वृद्धाला ऑनलाइन लाखोंचा गंडा
Published on: 

अंबरनाथ, ता. ७ (वार्ताहर) : मतदार पडताळणीच्या नावाखाली सायबर भामट्यांनी अंबरनाथमधील ६८ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाची सहा लाख ४८ हजार ९९५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. मतदार ओळखपत्रावरील नाव आणि वडिलांचे नाव जुळत नसल्याचे सांगत आरोपींनी बनावट संदेश, संकेतस्थळाची लिंक आणि भ्रमणध्वनी अनुप्रयोग पाठविला. तो उघडताच वृद्धाच्या खात्यातून मोठी रक्कम परस्पर काढण्यात आली.
अंबरनाथ पश्चिमेतील पनवेलकर कॅम्पसमध्ये राहणारे टोमी अल्बर्ट फर्नांडिस (वय ६८) यांच्या पत्नीच्या भ्रमणध्वनीवर ५ ऑक्टोबरला अज्ञात क्रमांकावरून संदेश आला. भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचा संदर्भ देत मतदार ओळखपत्रावरील नाव आणि वडिलांचे नाव जुळत नसल्याचे या संदेशात नमूद केले होते. मतदार माहिती अद्ययावत करण्यासाठी एका बनावट संकेतस्थळाची लिंक तसेच ‘ECINET LOGIN.apk’ ही फाईल पाठविण्यात आली. फर्नांडिस यांनी ती फाईल उघडली. मात्र, त्यानंतर भामट्यांनी भ्रमणध्वनी हॅक करत कॅनरा बँकेच्या खात्याची माहिती मिळवली. तसेच एटीएम कार्डचा संकेतांक बदलून खात्यातून सहा लाख ४८ हजार ९९५ रुपये परस्पर काढून घेतले. हा प्रकार लक्षात येताच फर्नांडिस यांनी अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात भ्रमणध्वनीधारक आणि बँक खातेदारांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील भदाणे अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com