बोर्लीपंचतन आरोग्यसेवा धोक्यात

बोर्लीपंचतन आरोग्यसेवा धोक्यात
Published on: 

बोर्लीपंचतन आरोग्यसेवा धोक्यात
केंद्राच्या स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर
श्रीवर्धन, ता. ७ (बातमीदार) : बोर्लीपंचतन येथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी प्रलंबित असतानाच, सध्या सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक ठरली आहे. इमारत पाडून नवीन बांधकाम करण्याची शिफारस झाली असून, केंद्र सुरू ठेवण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेतला जात आहे, मात्र गेल्या काही महिन्यांपासून पत्रव्यवहार, पाहणी आणि अहवालांची प्रक्रिया सुरू असूनही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाची मागणीही पुन्हा चर्चेत आली आहे.
१५ एप्रिल २०२६ रोजीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारतीच्या कॉलम, बीम आणि स्लॅबला तडे गेले असून, काँक्रीटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोखंडी सळ्यांना गंज लागल्याचेही निदर्शनास आले. किनारपट्टीचे वातावरण तसेच निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळांच्या काळातील अतिवृष्टीचा परिणाम इमारतीवर झाल्याचे अहवालात नमूद आहे. ११ जून रोजी बांधकाम विभागाने इमारत असुरक्षित असल्याचा अहवाल दिला.

तात्पुरत्या स्थलांतराची तयारी
२० जुलै रोजी ग्रामपंचायतीनेही इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग पडत असल्याचे निदर्शनास आणले. रुग्णांच्या जिवितास धोका असल्याने केंद्राचे कामकाज पर्यायी जागेत किंवा शाळेच्या इमारतीत हलविण्याची सूचना करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयेश गोसावी यांनी उपलब्ध समाज हॉलची पर्यायी जागेसाठी पाहणी सुरू असून, लवकरच केंद्र स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. नवीन इमारतीसाठी प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. बोर्लीपंचतन येथील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता फेब्रुवारी २०२५ मध्ये आम्ही बोर्लीपंचतन प्रा. आरोग्य केंद्र जसवली येथे व तेथील ग्रामीण रुग्णालय बोर्लीपंचतन येथे स्थलांतरण बाबत आरोग्य उपसंचालकांकडे पत्रव्यवहार केला आहे. यावर पाठपुरावा घेण्यात येईल. असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निशिकांत पाटील यांनी सांगितले.

पंचक्रोशीला सुसज्ज सुविधेची प्रतीक्षा
मबोर्लीपंचतन केंद्रावर २५ ते ३० गावांतील नागरिक अवलंबून असून, दररोज सुमारे ८० ते ९० रुग्णांची तपासणी होते. सर्पदंश, अपघात, प्रसूती तसेच गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी श्रीवर्धन किंवा माणगाव येथे जावे लागते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाची जुनी मागणी पूर्ण करण्याबरोबरच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याबाबत ठोस निर्णय कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com