

रबाळेत स्मशानभूमीचा मार्ग मोकळा
सुधाकर सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश
वाशी, ता. ८ (बातमीदार) : रबाळे एमआयडीसी परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची स्मशानभूमी व दफनभूमीची मागणी आता पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. माजी महापौर तथा नगरसेवक सुधाकर सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत असून, साईबाबानगर येथील भूखंड क्रमांक १५२ वर उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक स्मशानभूमी व दफनभूमीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. नववर्षात ही सुविधा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे, स्मशानभूमीच्या वास्तूमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून देण्याची संकल्पना सोनवणे यांनी मांडली असून, तीही प्रत्यक्षात येणार आहे.
रबाळे परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी तळवली गावाजवळील स्मशानभूमीत जावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेऊन सोनवणे यांनी एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला.
२०२२ मध्ये बांधकाम परवानगी मिळाल्यानंतरही विविध अडथळ्यांमुळे कामाला अपेक्षित गती मिळाली नाही. प्रकल्पाला काही विरोधही झाला, मात्र नागरिकांची मूलभूत गरज लक्षात घेऊन सोनवणे यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. दरम्यान, वृत्तपत्रांनी हा प्रश्न सातत्याने मांडल्यानंतर मानवाधिकार आयोगाने हस्तक्षेप करत न्यायालयात सुमोटो प्रकरण दाखल केले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशामुळे प्रकल्पाला गती मिळाली.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचाही विचार
रबाळे परिसरातील अनेक कुटुंबे लहान घरांमध्ये तसेच झोपडपट्टी भागात राहतात. त्यामुळे दहावी, बारावी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत वातावरणात अभ्यास करणे कठीण जाते. ही बाब लक्षात घेऊन स्मशानभूमीच्या वास्तूमध्ये अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सोनवणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी महापालिका व एमआयडीसीकडे वारंवार पाठपुरावा करून भूखंड आणि बांधकाम परवानगी मिळवली होती, मात्र विविध कारणांमुळे काम रखडले. वृत्तपत्रांनी हा प्रश्न मांडल्यानंतर मानवाधिकार आयोगाने यामध्ये हस्तक्षेप करत न्यायालयात सुमोटो दाखल केला. त्यामुळे या कामाला गती मिळाली.
— सुधाकर सोनवणे, माजी महापौर, नवी मुंबई पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.