नौपाड्याची कोंडी फुटणार

नौपाड्याची कोंडी फुटणार
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : नौपाड्यातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या शाहू मार्केटच्या जागी पार्किंग प्लाझा उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ठाणे पालिकेने शाहू मार्केटमधील ७५ गाळेधारकांना गाळे आठ दिवसांत रिकामे करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या जागेवर पार्किंगसह व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे पार्किंगच्या समस्येने त्रस्त असलेल्या नौपाड्याला हक्काच्या पार्किंगची सुविधा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शाहू मार्केटमधील गाळ्यांच्या वापरावरून काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत जोरदार चर्चा झाली होती. काही गाळेधारकांनी गाळे पोटभाड्याने दिल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला होता. गाळ्यांच्या बेकायदा खरेदी-विक्री आणि हस्तांतरणावरूनही प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले होते. असे असले तरीही शाहू मार्केटच्या जागेवर पार्किंग प्लाझा व व्यापारी संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. याआधी याचे नियोजन पालिकेच्या अर्थसंकल्पातही करण्यात आले होते. त्या दिशेने पाऊले उचलत प्रशासनाने याप्रकरणी कार्यवाही करत ७५ गाळेधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. आठ दिवसांत गाळे रिकामे करण्याचे निर्देश नोटिसीत देण्यात आले आहेत.

शाहू मार्केटची जागा नौपाड्याच्या मध्यवर्ती भागात असल्याने या ठिकाणी पार्किंग प्लाझा उभारल्यास परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे. महात्मा गांधी रोड, राम मारुती रोड, जांभळी नाका आणि ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांची मोठी वर्दळ असते. व्यापारी, ग्राहक तसेच स्थानिक रहिवाशांची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने अनेकदा कोंडीची परिस्थिती निर्माण होते. नव्या प्रकल्पामुळे या वाहनांना नियोजित पार्किंगची जागा उपलब्ध होणार आहे.

पाच मजल्यांचे व्यापारी संकूल
पालिकेच्या नियोजनानुसार सुमारे ७० कोटी १९ लाखांचा हा प्रकल्प प्रस्तावित आहे. यात तळघरात दुचाकींसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. लोअर तळमजल्यावर दुकाने आणि ग्राहक पंचायत कार्यालय, तर अप्पर तळमजल्यावर दुकाने असतील. त्यावरील पाच मजल्यांवर दुकाने आणि कार्यालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

वाहनधारकांना मोठा दिलासा
सध्या परिसरातील पार्किंगची गरज भागविण्यासाठी गावदेवी येथील भूमिगत पार्किंगसह विविध ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे, मात्र शाहू मार्केटच्या मध्यवर्ती जागेतच मोठी पार्किंग क्षमता निर्माण झाल्यास बाजारपेठेत येणाऱ्या वाहनधारकांना अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

५६७ वाहनांना पार्किंग
प्रस्तावित प्रकल्पात ३२० चारचाकी आणि २४७ दुचाकी, अशा एकूण ५६७ वाहनांसाठी पार्किंगची क्षमता निर्माण होणार आहे. पार्किंग टॉवरमध्ये तळमजल्यासह २० मजली व्यवस्था प्रस्तावित आहे. त्यामुळे सध्याच्या रस्त्यावरील पार्किंगचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

गाळेधारकांचे पुनर्वसन
पार्किंगसह व्यापारी संकुल उभारल्यानंतर सध्याच्या गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात करण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.

गाळाधारण प्रमाणपत्रांचे वाटप
शाहू मार्केटचे अत्याधुनिक वाहनतळात रुपांतर होत असताना येथील गाळेधारकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली होती. रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या काही गाळेधारकांचे यापूर्वी याच शाहू मार्केटमध्ये पुनर्वसन केले होते. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा विस्थापनाची वेळ येऊ नये, यासाठी म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. महापालिका आयुक्तांनी मागणी मान्य केल्याने पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यानिमित्त शिवसेना कार्यालयात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत गाळेधारकांना महापालिकेचे गाळाधारण प्रमाणपत्र देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com