

चाराविक्रीतून रोजचा रोजगार
पावसाळी कामांनंतर चाराविक्रीचा आधार
कासा, ता. ८ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे शेत, माळरान, पडीक जमीन आणि जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. हा नैसर्गिक चारा कापून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय अनेक आदिवासी कुटुंबांसाठी सध्या उदरनिर्वाहाचा आधार ठरत आहे. चाराविक्रीतून दररोज सुमारे ३०० ते ४०० रुपयांची कमाई होत असल्याने पावसाळ्यातील रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.
डहाणू तालुक्यातून शहरांकडे मोठ्या प्रमाणात दूधपुरवठा केला जातो. गाई-म्हशींसाठी हिरव्या चाऱ्याची गरज असल्याने दूध डेअरी चालक आणि पशुपालकांकडून या चाऱ्याला मागणी असते. त्यामुळे आदिवासी कुटुंबे पहाटे जंगल, डोंगरकपारी, माळरान आणि पडीक जमिनीवर उगवलेला चारा कापून त्याचे भारे बांधतात. त्यानंतर महामार्गालगतच्या ठरावीक ठिकाणी त्याची विक्री केली जाते.
गजाड, मेंढवण, चारोटी, ओसरवीरा, आवढाणी तसेच तलासरी परिसरात सकाळी आणि सायंकाळी महामार्गालगत चाराविक्री करणारी कुटुंबे आणि चारा खरेदीसाठी येणारी ट्रक, ट्रॅक्टरची वाहने दिसून येतात. सध्या एका चाऱ्याच्या भारासाठी सुमारे ५० रुपये मिळतात. पूर्वी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मोकळी मैदाने आणि जंगल क्षेत्र उपलब्ध होते, मात्र जमिनींच्या खरेदी-विक्रीमुळे अनेक ठिकाणी कुंपणे उभारण्यात आली असून नैसर्गिक चारा क्षेत्र कमी झाले आहे. ग्रामीण भागातील पशुधनाची संख्याही कमी झाल्याने उपलब्ध हिरवा चारा शहरांकडे पाठविला जात आहे. काही शेतकरी आपल्या गोधनासाठी आवश्यक चारा राखून उर्वरित चाऱ्याची विक्री करीत आहेत.
“पावसाळ्यातील बहुतांश कामे आटोपली आहेत. शहरात अद्याप कामाची मागणी नसल्याने पावसाळ्यात उगवणारा ताजा हिरवा चारा विकून पोटापाण्याचा प्रश्न सोडवीत आहोत. पहाटे लवकर उठून चारा कापण्यासाठी जावे लागते. या वेळी साप-विंचवांची भीती असते; मात्र चार पैसे हातात मिळत असल्याने हे काम करावे लागते.”
- रमेश पारधी, मजूर
डहाणू : महामार्गालगत विक्रीसाठी आणलेले हिरव्या चाऱ्याचे भारे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.