

महिला शेतकरी प्रमाणपत्राला प्रतिसाद
रायगडमध्ये ५६ हजार १०५ अर्ज; ग्रामपातळीवर पडताळणीची प्रक्रिया सुरू
अलिबाग, ता. ८ (वार्ताहर) : सातबारा उताऱ्यावर नाव नसले तरी प्रत्यक्ष शेती करणाऱ्या महिलांना अधिकृत शेतकरी ओळख मिळावी, यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ योजनेला रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार १०५ महिला शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रमाणपत्रामुळे महिलांना विविध कृषी योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.
शेती, पशुपालन, दुग्धव्यवसाय, बीजसंवर्धन, भाजीपाला उत्पादन तसेच शेतीमाल प्रक्रियेत महिलांचा मोठा सहभाग असतो, मात्र जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव नसल्याने अनेक महिला पीक कर्ज, विमा आणि कृषी अनुदानापासून वंचित राहत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा, २०२६’ अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे.
अद्याप अर्ज न केलेल्या महिलांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा घेऊन अर्जांची पडताळणी करून मंजुरी द्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.
सर्वाधिक अर्ज महाडमधून
महाडमध्ये सर्वाधिक सहा हजार ६५० अर्ज प्राप्त झाले असून, पेण पाच हजार ७७५, कर्जत पाच हजार ३३३, माणगाव चार हजार ९०३, पाली चार हजार ६१८ आणि रोहा चार हजार ६१७ अर्जांसह पुढे आहेत.
महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळावी
महिला शेती, पशुपालन आणि दुग्धव्यवसायात अग्रेसर आहेत. त्यांना ‘शेतकरी’ म्हणून ओळख मिळावी, यासाठी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे कृषी, दुग्धविकास व पशुसंवर्धन, राजिपचे सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.