

पश्चिम रेल्वेवर चार नवे फलाट; ३० ते ४० अतिरिक्त लोकलची शक्यता
बोरिवलीत दोन, अंधेरी आणि विरारमध्ये प्रत्येकी एक फलाट; गर्दीचा ताण कमी होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : पश्चिम रेल्वेवरील वाढती गर्दी आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी बोरिवली, अंधेरी आणि विरार स्थानकांत चार नव्या फलाटांची उभारणी करण्यात येणार आहे. बोरिवलीत दोन, तर अंधेरी आणि विरारमध्ये प्रत्येकी एक फलाट उभारला जाणार आहे. या कामांमुळे रेल्वेच्या परिचालनात लवचिकता वाढून विरारपर्यंत ३० ते ४० अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक स्वतंत्रपणे हाताळता येणार आहे. त्यामुळे गाड्यांच्या मार्गातील अडथळे कमी होऊन अतिरिक्त लोकल चालविण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील.
बोरिवली, अंधेरी आणि विरारमधील या विस्तारकामांमुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होणार असून, भविष्यात अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
बोरिवलीत दोन नवे फलाट
बोरिवली-विरार पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाचा भाग म्हणून बोरिवलीत एका नव्या फलाटाची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गाच्या विस्तारासाठी स्थानकाच्या दक्षिण बाजूस आणखी एक फलाट बांधण्यात येणार आहे. दोन्ही फलाटांची लांबी सुमारे ३३० मीटर आणि रुंदी सात मीटर असेल. विरारमध्येही पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेअंतर्गत अतिरिक्त फलाट उभारला जाणार आहे.
अतिरिक्त लोकलसाठी सुविधा
नवे फलाट आणि पाचवी-सहावी मार्गिका उपलब्ध झाल्यानंतर उपनगरी सेवांची संख्या वाढविण्यास पश्चिम रेल्वेला अधिक वाव मिळणार आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर परिचालनाच्या गरजांचा आढावा घेऊन विरारपर्यंतच्या अतिरिक्त सेवांचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे ३० ते ४० अतिरिक्त लोकल सुरू होण्याची शक्यता आहे.
अंधेरीत दोन टप्प्यांत विस्तार
दररोज सुमारे साडेचार लाख प्रवाशांची वर्दळ असलेल्या अंधेरी स्थानकावर एक हजारांहून अधिक उपनगरीय गाड्यांची ये-जा होते. त्यामुळे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी दोन टप्प्यांत विस्तार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात फलाट क्रमांक ४ आणि ५ दक्षिणेकडे वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे फलाट क्रमांक ५ वरून विरारच्या दिशेने गाड्या वळविणे अधिक सुलभ होणार आहे. फलाट क्रमांक ६ आणि ७ दक्षिणेकडे २० मीटर, तर उत्तरेकडे १० मीटरने वाढविण्यात येणार आहेत. सिग्नल एस-४९ दक्षिणेकडे हलविण्यात येणार असून, फलाट क्रमांक ७ च्या उत्तरेकडील टोकाला नवीन सिग्नल बसविण्यात येणार आहे. फलाटांच्या विस्तारामुळे ‘फ्लाइंग राणी’सारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या फलाटावर पूर्णपणे थांबविणे शक्य होणार आहे.
फलाट ९वरील गर्दीला लगाम
दुसऱ्या टप्प्यात सहाव्या मार्गिकेला लागून स्थानकाच्या उत्तरेकडील बाजूस १२ डब्यांचा नवा होम फलाट उभारण्यात येणार आहे. या फलाटावर दोन्ही बाजूंनी प्रवाशांना बाहेर पडता येणार आहे. त्यामुळे फलाट क्रमांक ९ वर येणाऱ्या प्रवाशांना अंधेरी पूर्वेकडील रस्त्याच्या दिशेनेही थेट बाहेर पडता येईल. सध्या फलाट क्रमांक ९ वर गाडी आल्यानंतर प्रवाशांना प्रामुख्याने पादचारी पूल आणि अरुंद जिन्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मोठी कोंडी होते. नव्या फलाटामुळे पादचारी पुलांवरील गर्दी कमी होऊन जिन्यांवरील प्रवाशांचा ताणही कमी होण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.