

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : महाराष्ट्रासह देशात प्रसिद्ध असलेल्या टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ७१ फूट उंच, १०० फूट रुंद आणि ११० फूट लांबीचा हा देखावा साकारण्यात आला आहे. सुमारे ३५० कारागिरांनी अडीच महिन्यांच्या कालावधीत या देखाव्याला आकार दिला आहे.
टेंभी नाका येथील श्री जय अंबे माँ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गेल्या ४८ वर्षांपासून हा नवरात्रोत्सव आयोजित केला जातो. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या उत्सवात ‘आई दुर्गेश्वरी’च्या दर्शनासाठी नऊ दिवस भाविकांची मोठी गर्दी होत असते. ही परंपरा आजही कायम असून, यंदाच्या उत्सवासाठी मंडप आणि सजावटीचे काम अंतिम टप्प्यात असून, बद्रीनाथ मंदिराच्या स्थापत्यशैलीवर आधारित देखावा उभारण्यात आला आहे.
५१ खांबांवर भव्य देखावा
बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती ५१ खांबांवर उभारण्यात आली आहे. देखाव्याच्या आतील भागाची उंची ३० फूट असून देवीचा गाभारा ४० बाय ४० फूट आकाराचा आहे. देखाव्याच्या प्रत्यक्ष जागेवरील कामाला २१ दिवस लागले असून, संपूर्ण निर्मितीसाठी सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी लागला. ज्येष्ठ कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा साकारण्यात आला आहे.
धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत देवीची पूजा-अर्चा, धार्मिक कार्यक्रम आणि भक्तिगीतांचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार असून, सायंकाळी गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे. उत्सवाच्या तयारीसाठी ट्रस्टचे अध्यक्ष उत्तमचंद सोळंकी, सचिव हेमंत पवार, उपसचिव सुधीर कोकाटे आणि खजिनदार कमलेश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते काम करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.