‘गावाकडची वाट’ आता सवलतीत

‘गावाकडची वाट’ आता सवलतीत
Published on: 

बदलापूर, ता. ८ (बातमीदार) : ग्रामीण व आदिवासी भागातून बाजारहाट, भाजीपाला विक्री, शिक्षण, नोकरी तसेच विविध कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक बदलापूर शहरात ये-जा करतात. या प्रवाशांसाठी एसटी बससेवा महत्त्वाची ठरत असून, सवलतीचा लाभ सहज मिळावा यासाठी नगरसेवक शरद तेली यांच्या माध्यमातून ‘राष्ट्रीय सामायिक प्रवास कार्ड’ (एनसीएमसी) काढण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात आले आहे. हे शिबिर ८, ९ आणि १० ऑक्टोबरला सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे.

सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी वापरता येणाऱ्या या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून पात्र प्रवाशांना एसटीच्या विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे. कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. बदलापूर शहराचा ग्रामीण व आदिवासी भागाशी सातत्याने संपर्क असल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. ग्रामीण व आदिवासी पाड्यांतील नागरिकांसाठी एसटी ही अनेकदा महत्त्वाची वाहतूक सुविधा ठरते. त्यामुळे पात्र शहरवासीयांनाही सवलतीचा लाभ मिळावा, या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले आहे. ७५ वर्षांवरील नागरिकांना १०० टक्के, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के, तर महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के तिकीट सवलत मिळते. त्यामुळे नियमित एसटी प्रवास करणाऱ्या पात्र प्रवाशांसाठी हे कार्ड प्रवासखर्चात बचत करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह पात्र नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com