

अँटिलिया स्फोटके प्रकरण
मर्सिडीज, बीएमडब्ल्यू अन् ‘ओबेरॉय’मध्ये मुक्काम
वाझे याच्या उत्पन्नावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या गाड्या कशा आल्या आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये तब्बल १०० दिवसांचा मुक्काम कसा शक्य झाला, असा सवाल करून उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ८) त्याच्या उत्पन्नावर प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, शहर पाेलिस आयुक्तालयातही ताे या महागड्या गाड्यांतूनच जात हाेता, याबाबत न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.
वाझेच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) याचिकेवर न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. साक्षीदारांचे जबाब वाचून दाखवताना वाझे महागड्या वाहनांतून प्रवास करीत असल्याची माहिती एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयाला दिली. त्यावर एपीआय दर्जाचा अधिकारी आयुक्तांच्या कार्यालयात आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीही मर्सिडीजने जातो हे कसे शक्य आहे? ओबेरॉय हॉटेलमध्ये १०० दिवस खोली बुक करून राहण्याबाबतही खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. सहाय्यक पाेलिस निरीक्षकाच्या पगारातून हे शक्य आहे का? या अधिकाऱ्याचे मासिक वेतन किती? अशी प्रश्नांची सरबत्तीच न्यायालयाने केली. त्यावर हा पगार सुमारे ९० हजार रुपये असल्याचे सिंह यांनी सांगितले.
जिलेटिनच्या कांड्या कुठून आल्या?
अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर उभ्या गाडीत सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या वाझेने कोठून खरेदी केल्या, याची माहिती एनआयएला होती का, हे दर्शवणारा काही पुरावा किंवा माहिती उपलब्ध आहे का, विक्रीसाठी जसा परवाना लागतो, तसाच खरेदीसाठीही परवाना आवश्यक असावा का, अशीही विचारणा न्यायालयाने केली. या कांड्या कोठून मिळवल्या त्याचा स्रोत तपासात स्पष्ट झाला नाही, तसेच वाझेने तपासात सहकार्य केले नसल्याचेही सिंह यांनी न्यायालयाला सांगितले.
-----------------
जामीन दिल्यास परिणाम काय?
वाझे पाच वर्षांहून अधिक काळ कोठडीत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही अनेक प्रकरणांत संबंधित आरोपीला दिलासा देताना हा मुद्दा विचारात घेतल्याची बाब लक्षात घेता, कडक अटींवर वाझेला जामीन दिल्यास काय अडचण किंवा नुकसान होईल, अशी विचारणा न्यायालयाने केली. वाझेला जामीन दिल्यास साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो, पुरावे नष्ट करण्याची शक्यता असल्याचा दावा एनआयएने केला. वाझे पोलिस अधिकारी असूनही त्याने गुन्हेगारी कृत्ये केली. एका व्यक्तीची हत्याही केली, असे सिंह यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून आपला युक्तिवाद संपुष्टात आणला. त्याची दखल घेऊन न्यायालयाने सुनावणी तहकूब करून जामिनाला अंतरिम स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.