

‘आयसिस’ प्रकरण
तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबाला बघून घेईन
आरोपीची विशेष सत्र न्यायाधीशांना धमकी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे आराेप असलेल्या एका आरोपीने विशेष सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांना धमकी दिली. ‘तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला बघून घेईन,’ असे धमकावत विद्यमान सरकार आणि न्यायव्यवस्थेबद्दल आक्षेपार्ह विधान केले. न्यायालयाने आरोपीच्या वर्तनाचा निषेध करून ते अत्यंत निंदनीय असल्याचे आदेशात म्हटले.
तीन वर्षांपूर्वी २०२३ मध्ये अटक केलेला आरोपी ताबीस सिद्दीकीला राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अभय जोगळेकर यांच्यासमोर नुकतेच हजर करण्यात आले. त्या वेळी त्याने न्यायाधीशांना त्यांचे नाव विचारले. सिद्दीकीने त्याला विद्यमान सरकारबद्दल कोणताही आदर नसल्याचे म्हटले. न्यायालयाने या घटनेबाबत नोंदवलेल्या आदेशानुसार, आरोपीने न्यायव्यवस्थेबद्दल अत्यंत अश्लील भाषेचा वापर केला आणि त्याला न्यायालयाबद्दल कोणताही आदर नसल्याचे म्हटले. आरोपीच्या या आक्रमक वर्तनानंतर पुढील आदेशापर्यंत त्याला केवळ व्हिसीद्वारे हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. खटल्याच्या कार्यवाहीपासून सुटका करून घेण्यासाठी तो केवळ मानसिक त्रासाचे नाटक करीत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
आरोपीच्या वैद्यकीय अहवालांचे पुनरावलोकन केल्यानंतर जे. जे. रुग्णालयात त्याची मानसोपचार चाचणी केली होती. त्याच्या अहवालात त्याला कोणताही गंभीर मानसिक आजार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपी केवळ खटल्याच्या कार्यवाहीपासून वाचण्यासाठी मानसिक आजाराचे नाटक करीत असल्याचे स्पष्ट होते, असे न्यायालयाने नमूद केले.
------
प्रकरण काय ?
‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रकरणी जुलै २०२३ मध्ये राज्यभरात टाकलेल्या विविध छाप्यांदरम्यान एनआयएने सात आरोपींना अटक केली त्यात सिद्दीकीचाही समावेश होता. आरोपींचे ‘आयसिस’शी सक्रिय संबंध होते आणि ते असुरक्षित तरुणांना या दहशतवादी संघटनेचा भारत-विरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा एनआयएने केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.