

जोगेश्वरीत पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात
रिक्षा पार्किंग, गोणी, कचऱ्यामुळे पादचारी रस्त्यावर; के पूर्व विभागाकडे कारवाईची मागणी
जोगेश्वरी, ता. १३ (बातमीदार) : जोगेश्वरी पूर्वेतील कै. यशवंतराव चव्हाण मार्गावरील हेमा इंडस्ट्रीजलगत तसेच जोगेश्वरी पूर्व टपाल कार्यालयासमोरील पदपथावर अतिक्रमण झाले आहे. दिवसा रिक्षांचे अनधिकृत पार्किंग, तर संध्याकाळनंतर कचरा वेचणाऱ्यांच्या गोणी आणि कचऱ्यामुळे फुटपाथ व्यापला जात असल्याने पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, के/पूर्व विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळच्या वेळेत पदपथावर रिक्षा उभ्या केल्या जातात. संध्याकाळनंतर गोणी आणि जमा केलेला कचरा फुटपाथवर ठेवला जातो. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी चालण्यास जागा शिल्लक राहत नाही. परिणामी, नागरिकांना वाहनांची वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागते. या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षित पायी वाहतुकीसाठी असलेले फुटपाथ अतिक्रमणामुळे वापरता येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
वाहतुकीला अडथळा
या परिसरातील रस्ता अरुंद असल्याने फुटपाथवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडीत भर पडते. रात्रीच्या वेळी परिसरात पुरेसा प्रकाश नसल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनतो. परिसरात शाळा असून, मेघवाडी पोलिस ठाणे जवळच असतानाही अतिक्रमणावर प्रभावी कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.