

एनएमएमटीच्या नवीन बस ‘भट्टी’
चालकांच्या सीटखाली सायलेन्सर; काम बंद आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ९ : वाढत्या उकाड्यात एनएमएमटीच्या नव्याने दाखल झालेल्या अशोक लेलॅण्ड कंपनीच्या सीएनजी बसमधील उष्णतेमुळे चालक त्रस्त आहेत. सायलेन्सरची ढोलकी थेट चालकाच्या सीटखाली बसवण्यात आल्याने केबिनमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होत असल्याची तक्रार चालकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व १५० बसची तातडीने तांत्रिक पुनर्तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
एनएमएमटीने काही महिन्यांपूर्वी अशोक लेलॅण्ड कंपनीकडून १५० नवीन सीएनजी बस खरेदी केल्या आहेत. मात्र, या बसच्या रचनेमुळे चालकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येते. जुन्या बसमध्ये सायलेन्सरची ढोलकी चेसिसच्या मध्यभागी असल्याने तिच्या उष्णतेचा चालकाच्या सीटवर थेट परिणाम होत नव्हता. नव्या बसमध्ये मात्र सायलेन्सरची ढोलकी आणि एक्झॉस्टची रचना चालकाच्या सीटखाली असल्याने इंजिन सुरू असताना तेथील उष्णता वाढते, असा चालकांचा दावा आहे.
तासन्तास बस चालवताना केबिनमध्ये प्रचंड उकाडा जाणवत असल्याने शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रश्न केवळ ड्युटी बदलाचा नसून, बसच्या तांत्रिक रचनेशी संबंधित असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
कामगार संघटना आक्रमक
केबिनमधील उष्णतेमुळे चालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे. चालकांचे आरोग्य आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्व बसची तांत्रिक तपासणी करावी तसेच आवश्यकतेनुसार सायलेन्सरची जागा बदलून योग्य दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास चक्का जाम किंवा काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
ड्युटी बदलामुळे तक्रारी : प्रशासन
दरम्यान, एनएमएमटी प्रशासनाने या तक्रारींबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. नव्या बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर कंत्राटी चालकांच्या ड्युटीचे पुनर्नियोजन करण्यात आले. पूर्वी वातानुकूलित बसवर काम करणाऱ्या काही चालकांना साध्या सीएनजी बसवर नियुक्त करण्यात आल्याने या तक्रारी उद्भवल्या असाव्यात, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तथापि, बसच्या पुनर्तपासणीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती व्यवस्थापक जंगले यांनी दिली. त्यामुळे तपासणीतून नेमके काय निष्पन्न होते आणि चालकांच्या तक्रारींवर कोणती तांत्रिक उपाययोजना केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.