

नवी मुंबई, पनवेलमध्ये तीव्र उकाडा
गेल्या आठ दिवसांत तापमानाचा पारा वाढला, नागरिक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ९ : गेल्या आठ दिवसांपासून नवी मुंबई, पनवेल आणि लगतच्या परिसरात तापमानाचा पारा कमालीचा चढला असून, नागरिक तीव्र उकाड्याने आणि उन्हाच्या झळांनी बेजार झाले आहेत. परतीचा पाऊस लांबल्यामुळे आणि वातावरणात झालेल्या बदलांमुळे कमाल तापमानात सलग वाढ नोंदवली जात आहे. गेल्या आठवडाभरात या परिसरातील तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसवरून थेट ३७ ते ३८ अंश सेल्सिअसच्या पार पोहोचले आहे. त्यातच हवेतील ६० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा जाणवणारा उकाडा ३९ ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत अनुभवला जात असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे.
हवामानाचा अंदाज देणाऱ्या सरकारी संकेतस्थळावर नोंदवलेल्या गेल्या आठ दिवसांतील हवामानाचा आढावा घेतला असता, सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते आणि दुपारी १२ ते ४ या वेळेत तीव्रता पराकोटीला पोहोचत आहे. अचानक वाढलेल्या या उष्णतेमुळे नोकरदार, विद्यार्थी आणि बाहेर फिरणाऱ्या चाकरमान्यांची मोठी कोंडी होत आहे. दुपारच्या वेळेत शहरातील प्रमुख मार्ग, बाजारपेठा आणि बस स्थानकांवर नागरिकांची उपस्थिती नेहमीपेक्षा विरळ झालेली पाहायला मिळत आहे. उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी नागरिक थंड पेये, लिंबू-पाणी, उसाचा रस आणि शहाळ्यांच्या स्टॉल्सवर गर्दी करीत असून गॉगल, टोपी आणि स्कार्फचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, पावसाच्या परतीच्या प्रवासातील खंड, ढगांचे प्रमाण कमी होऊन मिळालेला थेट सूर्यप्रकाश आणि समुद्रावरून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे तापमानात ही अचानक वाढ झाली आहे. आगामी काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून, हवेतील आर्द्रतेमुळे रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवत आहे. या वाढत्या तापमानामुळे डिहायड्रेशन, चक्कर येणे, थकवा आणि त्वचेचे त्रास वाढण्याचा धोका असल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उन्हाच्या या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, दुपारच्या वेळी थेट उन्हात जाणे टाळावे आणि सुती कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.