

ठाणे पालिका अधिकाऱ्याच्या प्रतिमेला चपलांचा हार
दहा दिवसांत दुसरी घटना; अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : दहा दिवसांपूर्वी वर्तकनगर प्रभाग समितीत निविदेच्या मुद्द्यावरून गोंधळ झाल्यानंतर पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले होते. असे असताना पुन्हा मुंब्रा प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंत्याविरोधात गुरुवारी (ता. ८) राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. या वेळी संबंधित अधिकाऱ्याच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून निषेध नोंदविण्यात आला.
मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीतील एका विकासकामाला विलंब होत असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मात्र, पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याने विधी विभागाच्या सल्ल्यानुसार संबंधित काम थांबविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. असे असतानाही पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करीत घोषणाबाजी केली आणि अधिकाऱ्याच्या प्रतिमेला चपलांचा हार घातला. आंदोलनावेळी संबंधित अधिकारी दालनात उपस्थित नव्हते. या प्रकरणाची वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली असून, त्यांचे निर्देश मिळाल्यानंतर कार्यवाही केली जाईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, विकासकामांच्या दिरंगाईबाबत लोकप्रतिनिधींकडून जाब विचारला जाणे अपेक्षित असले, तरी आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांच्या प्रतिमेचा अवमान करण्याच्या प्रकारांमुळे प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनोबलाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. वर्तकनगरमधील घटनेनंतर लेखणी बंद आंदोलन करूनही अशा प्रकारांची पुनरावृत्ती होत असल्याने लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांच्यातील संबंधांमधील तणाव पुन्हा अधोरेखित झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.