मरीन ड्राइव्हवर प्रकाश-प्रदूषण गंभीर!

मरीन ड्राइव्हवर प्रकाश-प्रदूषण गंभीर!
Published on: 

मरीन ड्राइव्हवर प्रकाश-प्रदूषण गंभीर!

जिमखान्यावरील फ्लडलाइट्सबाबत न्यायालयाची नाेटीस

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मरीन ड्राइव्ह परिसरातील जिमखान्यांचे फ्लडलाइट्स आणि जाहिरात फलकांमुळे होणाऱ्या प्रकाश प्रदूषणाचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. रात्रीच्या प्रखर प्रकाशामुळे रहिवाशांची झोप आणि आरोग्य बाधित होत असून, झाडे, वन्यजीव आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याची दखल घेत न्यायालयाने शुक्रवारी (ता. ९) राज्य सरकारसह संबंधित यंत्रणांना नोटिसा बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

दक्षिण मुंबईतील रहिवासी आणि आयटी व्यावसायिक तसेच खगोल-छायाचित्रकार असलेल्या नीलेश देसाई यांनी ॲड. रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. २०१६ पासून संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही ही समस्या अद्याप कायम असल्याचे याचिकेत म्हटले आहे. विल्सन जिमखान्यासह इतर जिमखाने आणि आस्थापनांमधील प्रकाशयोजनेमुळे होणाऱ्या प्रकाश प्रदूषणाचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रकाश-प्रदूषण नियंत्रित ठेवणारी नियमावली तयार करण्याची मागणी केली आहे. रात्री होणाऱ्या अति-तीव्रतेच्या प्रकाशामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य आणि झोपेवर परिणाम होत आहे. झाडे आणि वन्यजीवांचेही नुकसान होत आहे. वाहन चालवताना थेट डोळ्यात जाणारा प्रखर प्रकाश वाहनचालकांसाठी दृश्यमानतेच्या दृष्टीने धोक्याचा असून, त्याबाबतही याचिकेत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

ऑक्टोबर २०१६ मध्ये मरीन ड्राइव्ह पोलिसांनी विल्सन जिमखान्याच्या व्यवस्थापकाला बजावलेल्या नोटिसीचा संदर्भ याचिकेत दिला आहे. मरीन ड्राइव्ह परिसरासाठीच्या सर्वसाधारण धोरणांतर्गत ‘पोलिस जिमखाना मैदानाच्या आसपासच्या परिसरात प्रकाशयोजना व जाहिरातींचे फलक लावण्यास परवानगी नाही. त्याबाबत ३० जून २०१७ मुंबई हेरिटेज कन्झर्व्हेशन समितीच्या बैठकीतील इतिवृत्तामध्येही नमूद केल्याचे याचिकेत म्हटले आहे. देसाई यांनी जानेवारी २०१८ मध्ये मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांनाही समस्येबाबत माहिती देण्यात आली; मात्र इतक्या उपाययोजना करूनही अति-प्रकाशयोजनेचा त्रास सुरूच असल्याचा आरोप देसाईनी केला आहे.

योग्य नियमावली आवश्यक
याचिकेत विल्सन जिमखान्याजवळील ८४,८०० लक्सपर्यंत (एखाद्या पृष्ठभागावर पडणाऱ्या तीव्र प्रकाशाचे प्रमाण) प्रकाश तीव्रता असल्याचे तर मरीन ड्राइव्ह सभोवतालची प्रकाश पातळी सुमारे २,१०० लक्स असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात योग्य नियमावली करून अधिकाऱ्यांना त्यांची अंमलबजावणी करण्याचे, प्रकाशाची स्वीकारार्ह पातळी निर्धारित करण्याचे, खाली झाकणारे दिवे (डाऊनवर्ड-शील्डेड फिक्स्चर्स) अनिवार्य करण्याचे आणि ‘डार्क स्काय’ फ्रेंडली झोन ​​तयार करण्याबाबत विचार करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. तसेच रात्री १० नंतर तीव्र प्रकाशव्यवस्थेवर निर्बंध घालण्याची मागणीही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com