

अमली पदार्थ रॅकेटला अंबरनाथमध्ये मकोका
नऊ आरोपींना अटक, सात जणांचा शोध सुरू
अंबरनाथ, ता. १० (वार्ताहर) : अंबरनाथ शहरातील अमली पदार्थांच्या रॅकेटविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मकोका) कारवाईसाठी पूर्वपरवानगी देण्यात आली आहे. अंबरनाथ पोलिस ठाण्यातील अमली पदार्थांच्या गुन्ह्यात नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी सात आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीचा कथित प्रमुख शरीफ सलीम शेख याच्यासह एकूण १६ जणांचा या कारवाईत समावेश आहे.
अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार अंबरनाथ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. संघटित गुन्हेगारीचे स्वरूप असल्याचे नमूद करीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी ५ ऑक्टोबरला मकोका लागू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची आणि तपासातील कागदपत्रांची छाननी केल्यानंतर पूर्व प्राधिकृत मंजुरी देण्यात आली. कल्याण परिमंडळाचे पूर्व विभागाचे अपर पोलिस आयुक्त संजय बाजीराव जाधव यांनी गुरुवारी (ता. ८) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाअंतर्गत ही पूर्वपरवानगी दिली. त्यानुसार या प्रकरणात मकोकाअंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शरीफ शेख टोळीचा प्रमुख असल्याचा उल्लेख
पोलिसांच्या आदेशानुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शरीफ सलीम शेख (वय ३२) याच्यासह आयाज सय्यद, नूरजहाँ शेख, शकीरा अन्सारी, अल्लाबक्ष शेख, नियाज सय्यद, करण बाबर, आसिया शेख आणि सफिया शेख यांचा समावेश आहे. तर शबाना ऊर्फ शबनम शेख, आसिफ ऊर्फ केके, अब्दुल ऊर्फ टोपी, अतिश सुरेंद्र सिंह, शोएब खान, नगमा खान आणि जोसेफ या सात आरोपींचा शोध सुरू आहे. संबंधित टोळीविरोधात यापूर्वीही अमली पदार्थांच्या गुन्ह्यासह अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्याचा आणि न्यायालयाने त्यांची दखल घेतल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे. आर्थिक लाभ आणि अन्य फायदे मिळवण्यासाठी संघटितपणे बेकायदा कृत्ये सुरू असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने मकोका लागू करण्यास मंजुरी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.