

ऑगस्ट क्रांती मैदानात
आंदोलनाचा भडका
पोलिस-आंदोलकांत पाठशिवणीचा खेळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पहिल्या दिवशी आंदोलनाचा भडका उडाल्याचे चित्र होते. या वेळी शिवाजी पार्क नव्हे, तर भारत छोडो आंदोलन जिथून सुरू झाले त्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर जेन-झीचे आंदोलन झाले. दिवसभरात जेन-झीने पोलिसांची चांगलीच दमछाक केली. दिवसभरात जवळपास ४००हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, आमदार वरुण सरदेसाई आणि अभिनेता इम्रान खान यांना ताब्यात घेण्यात आले.
दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या ‘हम भारत के लोग’ या संघटनेने ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन करण्यासाठी हाक दिली होती. आंदोलनापूर्वीच मुंबई पोलिसांनी तुषार गांधी यांना ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी नेल्याचे वृत्त पसरताच अनेकांनी ऑगस्ट क्रांती मैदानाकडे धाव घेतली. दुपारी ३.३०नंतर डाव्या पक्षांचे आणि इतर संघटनांचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस कुमक तैनात केली होती. बंदोबस्तासाठी हजार पोलिस तैनात असल्याचे सांगण्यात आले.
घटनास्थळी जमताच या युवकांना तातडीने ताब्यात घेण्याचे सत्र पोलिसांनी सुरू केले. येथे येणाऱ्या युवकांना एक मिनिटही थांबू दिले जात नव्हते; मात्र दिवसभर जत्थ्याजत्थ्याने युवक जमत होते. घोषणा देऊन अटक करून घेत होते. या भागात चिंचोळ्या गल्ल्या आहेत. यातून युवक अचानक येत होते आणि घोषणाबाजी करीत होते. अनेक आंदोलक पोलिसांना चकवा देत होते. या आंदोलनात मुलींचा सहभाग अधिक होता. ताब्यात घेतल्यानंतर या युवकांना ताडदेव, गावदेवी यांसह विविध पोलिस ठाण्यांत नेण्यात आले. तिथे त्यांची माहिती घेऊन सोडून देण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
पोलिसांची दमछाक
युवकांनी पोलिसांना आजच्या आंदोलनात चांगलेच दमवल्याचे चित्र होते. घोषणा देऊन पळून जाणाऱ्या युवकांचा पाठलाग करताना अनेक पोलिस थकले. आंदोलकांच्या मागे धावून दमल्यांनतर पोलिसांवर जवळच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयात विश्रांती घेण्याची वेळ आली होती. आज मुंबईत दुर्गादेवीचे आगमन झाले. त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लागला होता. त्यातच या आंदोलनामुळे पोलिस पुरते थकल्याचे जाणवले.
...
राजकीय पक्ष आणि संघटनांसाठी नव्हे, तर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी मी एक भारतीय नागरिक म्हणून आलो आहे. शांतपणे आंदोलन करीत असतानाही पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, हे योग्य नाही.
- इम्रान खान, अभिनेता
==
नरेंद्र मोदी सरकारच्या दमदाटीला आम्ही घाबरणार नाही. थोडे दिवस शिल्लक राहिल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. वरून आदेश आल्यामुळे पोलिस असे वागत आहेत.
- वरुण सरदेसाई, आमदार, शिवसेना (ठाकरे गट)
==
आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे. जे देशात सुरू आहे ते चुकीचे असून, त्याविरोधात मी आवाज उठवत राहणार आहे.
- कस्तुरी गांधी,
तुषार गांधी यांची मुलगी
..
अत्यंत वाईट रीतीने पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. ज्या पंतप्रधानांना आम्ही तीन वेळा निवडून दिले, त्यांनी देशातील युवकांना अशा पद्धतीने वागणूक द्यावी, याचे दुःख आहे.
- अली भोजानी, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.