

पोलिसांच्या वागणुकीवर जेन-झी संतप्त
ऑगस्ट क्रांती मैदानवर आंदोलनात तरुणाईचा जोश
नितीन जगताप : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : दिल्लीतील ‘सीजेपी’च्या आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी (ता. १०) ऑगस्ट क्रांती मैदानात तरुणाई मोठ्या प्रमाणात जमली होती. एरवी मुंबई पोलिस जेन-झीसोबत सौजन्याने वागत असल्याचे चित्र होते; मात्र आज आम्हाला गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिल्याची तक्रार या वेळी विद्यार्थ्यांनी केली. त्यातच आंदोलन पाहण्यासाठी जमलेल्या काही तरुणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे चित्र होते. दुसरीकडे पोलिसांनी आंदोलनाला कोणतीही परवानगी नसल्याचे सांगत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई केल्याचे सांगितले.
शिवाजी पार्कमध्ये यापूर्वी झालेल्या आंदोलनात जेन-झीने ‘मुंबई पोलिस आय लव्ह यू’च्या घोषणा दिल्या होत्या. मात्र, ऑगस्ट क्रांती मैदानावर आज झालेल्या आंदोलनात ‘मुंबई पोलिस मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. तरुणाईचे शांततापूर्ण आंदोलन पोलिसांनी अत्यंत अमानुषपणे दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तरुणाईने केला. येथे येणाऱ्या प्रत्येकाला काही मिनिटांतच पोलिस व्हॅनमध्ये वाईट रीतीने कोंबले जात होते. या दरम्यान एका मुलीचा शर्ट फाटल्याची तक्रार काही तरुणींनी केली. दुसरीकडे पोलिस उपायुक्त (दक्षिण परिमंडळ-२) रागसुधा आर यांनी सांगितले, ‘‘ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज स्थानिक पोलिस ठाण्याकडे आला नाही. त्यामुळे या ठिकाणी जमण्याची अधिकृत परवानगी कोणालाही दिलेली नाही.’’ मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑगस्ट क्रांती मैदान हे आंदोलनाचे ठिकाण नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
आम्ही गुन्हेगार आहोत का?
एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही आंदोलन करीत आहोत. मात्र, पोलिसांकडून खूप वाईट रीतीने आमच्यावर कारवाई केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलन करणे आमचा संविधानिक अधिकार आहे. आम्ही गुन्हेगार आहोत का, असा प्रश्न काही आंदोलकांनी उपस्थित केला. महिलांवर सायंकाळी सूर्यास्तानंतर पोलिस कारवाई करता येत नाही. असे असताना सहानंतरही अनेक विद्यार्थिनींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप आंदोलक मुलींनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.