प्रदूषणकारी विकासकामे सील करणार

प्रदूषणकारी विकासकामे सील करणार
Published on: 

प्रदूषणकारी विकासकामे सील करणार
नवी मुंबई पालिकेची कडक पावले
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : आगामी हिवाळी हंगामात शहरातील हवेची गुणवत्ता ढासळू नये आणि बांधकामांच्या ठिकाणी होणारे वायुप्रदूषण रोखले जावे, यासाठी पालिकेने कडक पावले उचलली आहेत. हवेचे प्रदूषण रोखणाऱ्या नियमांचे उल्लंघन झाल्यास विकासकामे तत्काळ थांबवून संबंधित जागा सील करणे आणि आर्थिक दंड ठोठवण्याचा थेट इशारा प्रशासनाने दिला आहे.
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आर्किटेक्ट्स, बिल्डर्स, सर्व्हेअर्स आणि संबंधित भागधारकांची संयुक्त बैठक पार पडली. यामध्ये उच्च न्यायालय व उच्चस्तरीय समितीच्या निर्देशांनुसार शहरातील सर्व बांधकाम ठिकाणी वायुप्रदूषण नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीस सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, नगररचनाकार युवराज चव्हाण, कार्यकारी अभियंता राजेश पवार यांच्यासह नगररचना विभागातील इतर अधिकारी, अभियंते, बांधकाम विकसक, वास्तुविशारद व कंत्राटदार उपस्थित होते.
कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले की, वाढते प्रदूषण आणि ढासळती हवेची गुणवत्ता ही केवळ एक कायदेशीर बाब नसून नागरिकांच्या आरोग्याशी जोडलेली गंभीर समस्या आहे. हिवाळ्यात प्रामुख्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना प्रदूषणाचा मोठा फटका बसतो. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी आपली सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आपणही याच शहराचे नागरिक आहोत आणि हीच हवा श्वसनासाठी वापरतो, याचे गांभीर्य सर्वांनी बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांनी कडक कारवाईचा इशारा देताना स्पष्ट केले की, या सर्व नियमांच्या अंमलबजावणीसाठी शनिवार, १० ऑक्टोबरपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

संयुक्त पाहणी दौरा करणार
नगररचना विभाग आणि विभाग कार्यालयांच्या अधिकाऱ्यांमार्फत संयुक्त पाहणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन किंवा अपूर्णता आढळेल तिथे तत्काळ काम थांबवणे, जागा सील करणे आणि मोठा आर्थिक दंड ठोकणे, अशी कठोर कारवाई केली जाईल. तसेच, या नियमांची माहिती सर्व विकसकांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्रेडाई आणि इतर बिल्डर असोसिएशनच्या समन्वयाने लवकरच एक विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व घटकांनी महापालिकेला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

उपाययोजना कराव्या लागणार
पिण्याच्या पाण्याच्या वापरावर पूर्ण बंदी
बांधकाम स्थळावर बांधकामासाठी तसेच जमिनीवरील धूळ बसविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. बिल्डर्सनी यासाठी बिगर-पिण्याचे किंवा प्रक्रिया केलेले पाणी वापरणे अनिवार्य आहे. याचे उल्लंघन झाल्यास कोणतीही सूट न देता तत्काळ काम थांबवण्याचे आणि जागा सील करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

अनिवार्य बांधकाम नियमावली
सर्व बांधकाम ठिकाणी ३० फूट उंचीचे बॅरिकेडिंग लावणे, इमारतीला वरून खालीपर्यंत पूर्णपणे झाकणारी हिरवी जाळी (ग्रीन-नेट) लावणे, वाहनांच्या चाकांमुळे रस्त्यावर धूळ पसरू नये म्हणून बाहेर पडण्याच्या मार्गावर टायर-वॉशिंग सुविधा उभारणे आणि नियमित पाणी फवारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हवेच्या गुणवत्तेवर थेट नजर
प्रत्येक बांधकाम क्षेत्रावर हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स बसविणे आणि नागरिकांना हवेची सद्यःस्थिती कळावी यासाठी एक्युआय डिस्प्ले फलक लावणे अनिवार्य आहे. यापुढे बीपीएमएस प्रणालीद्वारे आवश्यक सर्व प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची पूर्तता केल्याचे दस्तऐवज आणि बिल्डर व वास्तुविशारद यांचे हमीपत्र घेतल्याशिवाय बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र दिले जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com