नवी मुंबई महापालिकेच्या सरळसेवा पदभरती परीक्षा जाहिर

नवी मुंबई महापालिकेच्या सरळसेवा पदभरती परीक्षा जाहिर
Published on: 

नवी मुंबई महापालिकेच्या सरळसेवा पदभरतीचे निकाल जाहीर
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियुक्ती प्रक्रियेबाबत प्रशासनाचे स्पष्टीकरण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : पालिकेच्या नियमित आस्थापनेवरील गट-अ, ब व क मधील विविध सहा संवर्गांतील रिक्त पदांसाठी जुलै महिन्यात पार पडलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाइन परीक्षेचे स्कोर-कार्ड शुक्रवारी (ता. ९) पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर, कनिष्ठ अभियंता (विद्युत व यांत्रिकी) या पदांवरील नियुक्तीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पालिकेच्या आस्थापनेवरील सरळसेवा पदभरतीसाठी १४ डिसेंबर २०२५ रोजी जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या १५ एप्रिल या अंतिम मुदतीपर्यंत विविध संवर्गांसाठी एकूण १९,२२० उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी सहा संवर्गांतील एकूण ३६ रिक्त पदांसाठी १८,९३० उमेदवारांची टीसीएस आयओएन या संस्थेमार्फत २१ जुलै व २२ जुलै २०२६ रोजी राज्यातील ६ जिल्ह्यांतील १३ परीक्षा केंद्रांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती.

संवर्गनिहाय पदसंख्या आणि अर्जदारांचा तपशील
कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी १७ पदांकरिता ३६० अर्ज, सहाय्यक आयुक्त पाच पदांकरिता १६,२५१ अर्ज, महापालिका उपसचिव एक पदासाठी ८५ अर्ज, सहाय्यक विधि अधिकारी एक पदासाठी २१४ अर्ज, कनिष्ठ अभियंता विद्युत आठ पदासाठी १,२३९ अर्ज, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी चार पदाकरिता ७८१ अर्ज अशा प्रकारे एकूण ३६ पदांकरिता १८,९३० उमेदवारांनी अर्ज सादर केले.

सहाय्यक आयुक्त पदासाठी मुख्य परीक्षेचे नियोजन
प्राप्त अर्जांची अफाट संख्या लक्षात घेता, सहाय्यक आयुक्त या संवर्गासाठी पूर्व परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवर्गनिहाय एका पदाकरिता २० उमेदवार १:२० प्रमाण याप्रमाणे मुख्य परीक्षेकरिता उमेदवारांची संख्या निश्चित करून त्यांना पात्र ठरवले जाणार आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी व परीक्षेचे वेळापत्रक लवकरच महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश व कंत्राटी पदांवरील नियुक्तीचा निर्णय
न्यायालयाचे आदेश विचारात घेता, ज्या पदांवर सध्या करार पद्धतीने कर्मचारी कार्यरत आहेत, तेवढी पदे वगळून उर्वरित पदांवरच तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका दिल्या जाणार आहेत. सध्या कनिष्ठ अभियंता (विद्युत) संवर्गात अनुसूचित जाती प्रवर्गातील एक आणि कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) संवर्गात इतर मागासवर्गातील एक व खुल्या प्रवर्गातील दोन असे एकूण तीन कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याप्रकरणी अंतिम निकाल आल्यानंतरच उर्वरित पदांवर नियुक्ती देण्याबाबत पालिकेकडून पुढील निर्णय घेतला जाईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com