पाच वर्षात पनवेलचे दिड अंशाने तापमान वाढले!

पाच वर्षात पनवेलचे दिड अंशाने तापमान वाढले!
Published on: 

पाच वर्षांत पनवेलचे तापमान वाढले दीड अंशाने!
महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून धोक्याची घंटा
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ ः मुंबई महानगर प्रदेशाचे प्रमुख प्रवेशद्वार आणि गेल्या काही वर्षांत अत्यंत वेगाने विस्तारणारे शहर म्हणून पनवेलची ओळख निर्माण झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, तळोजा एमआयडीसी आणि राष्ट्रीय महामार्गांचे जाळे यांसारख्या सुविधांमुळे पनवेलमध्ये नागरीकरण वेगाने वाढत आहे. परंतु, या महाकाय विकासाच्या ओघात पनवेल शहराचे तापमान तब्बल दीड अंशाने वाढले असल्याचे महापालिकेने जाहीर केलेल्या ‘नवीन पर्यावरण सद्य:स्थिती’ अहवालात नमूद केले आहे. एकीकडे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असताना वाढत्या तापमानामुळे पनवेलकरांची लाही लाही होत असून, ही शहरासाठी मोठी धोक्याची घंटा ठरत आहे.

अहवालातील सांख्यिकी आणि भू-स्थानिक विश्लेषणाचा सखोल अभ्यास केला असता शहरासमोर प्रमुख पाच पर्यावरणीय धोके उभे राहिल्याचे दिसून येते आहे.
२०२० ते २०२५ या वर्षांत पनवेलच्या सरासरी वार्षिक तापमानात तब्बल १.४ अंश सेल्सिअसची वाढ नोंदवली गेली. ३४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असलेल्या उष्ण दिवसांची संख्या २४ टक्क्यांनी वाढली आहे, तर उष्ण रात्रींचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले आहे. मे २०२५ मध्ये कमाल तापमान ३८.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. तळोजा एमआयडीसी, कामोठे, कळंबोली आणि नवीन पनवेल यांसारख्या अति-बांधकाम झालेल्या व घनदाट भागात अर्बन हीट आयलंड प्रभाव दिसून येत असून, हे भाग सभोवतालच्या हरित क्षेत्रांपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसने अधिक तापत आहेत.
उपग्रह प्रतिमांच्या विश्लेषणावरून असे स्पष्ट झाले आहे, की २०२२ मधील ४०.२ टक्के असलेला बांधकाम व शहरी भाग २०२५ मध्ये वाढून ४२.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसरीकडे वनाच्छादित क्षेत्र १६.२ टक्क्यांवरून १५.३ टक्क्यांपर्यंत घटले आहे, तर जलस्रोतांचे प्रमाण अवघे ४.४ टक्के उरले आहे. २०२५मध्ये विकासयोग्य जमिनीची मागणी ४१.२ चौरस किमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात तीन बिल्डेबल जमिनीची उपलब्धता अवघी ३१.८ चौरस किमी राहिली आहे. पनवेल पालिका क्षेत्रात २०२५ मध्ये दररोज १९४ एमएलडी पाण्याची मागणी असताना प्रत्यक्षात १६२ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. म्हणजेच दररोज ३२ एमएलडी अशी सुमारे १६ टक्के पाण्याची थेट तूट जाणवत आहे.
सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे पनवेल आपल्या ७७ टक्के पाणीपुरवठ्यासाठी तानसा, भातसा आणि एमआयडीसी यांसारख्या बाह्य स्रोतांवर अवलंबून आहे. शहरात प्रतिव्यक्ती पाणी उपलब्धतेचे प्रमाण अवघे १०८ एलपीसीडी असून, ते १३५ एलपीसीडी या राष्ट्रीय मानकापेक्षा खूपच कमी आहे. त्यातच २८ टक्के पाणी हे गळती व उत्पन्न पाणी म्हणून वाया जात आहे. पनवेलचे रूपांतर केवळ सिमेंट काँक्रीटच्या शहरात न होता ते एक राहण्यायोग्य, निरोगी आणि हवामान लवचिक शहर बनवण्यासाठी दृष्टिकोन २०३५ आखण्यात आला आहे. यासाठी महापालिका, औद्योगिक क्षेत्र आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.

हवा आणि ध्वनिप्रदूषणाचा वाढता आलेख
पनवेलचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक १०० असा मध्यम श्रेणीत नोंदवला गेला आहे. मात्र, हवेतील घातक सूक्ष्म धूलिकण पीएम २.५ आणि पीएम १० यांचे प्रमाण सीपीसीबीच्या सुरक्षित मानकांपेक्षा अनुक्रमे ४० आणि ६० जास्त आहे. या प्रदूषणात ४६ टक्के वाटा रस्ते वाहतुकीचा आणि २० टक्के वाटा बांधकामाच्या धुळीचा आहे. ध्वनिप्रदूषणाचा विचार करता, शहरात दिवसाची सरासरी आवाज पातळी ६८.२ डीबी आणि रात्रीची ५९.१ डीबी इतकी आहे. शहरातील ४६ टक्के ठिकाणी दिवसा तर ३४ टक्के ठिकाणी रात्री आवाजाची मर्यादा ओलांडली जाते. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कळंबोलीजवळ सर्वाधिक ७८.३ डीबी आणि पनवेल शहर केंद्रात ७४.५ डीबी ध्वनी नोंदवला गेला आहे.

वृक्षसंपत्तीची विषमता आणि जलस्रोतांचे प्रदूषण
पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण सहा लाख ७८ हजार ६०७ वृक्ष नोंदवले गेले असले, तरी त्यातील जवळपास निम्मी झाडे तीन लाख ३१ हजार १६८ ही परदेशी व विदेशी प्रजातींची आहेत. तसेच वृक्षांचे वितरण अत्यंत असमान असून, वॉर्ड १, २, ३ आणि ५ मध्ये शहराच्या एकूण वृक्षसंख्येपैकी ६०.५ टक्के झाडे आहेत; तर वॉर्ड ८, १० आणि १२ मध्ये प्रत्येकी पाच हजारपेक्षा कमी झाडे आहेत. याशिवाय गणेशोत्सव व इतर सणांच्या विसर्जनादरम्यान पनवेल खाडीतील विरघळलेला ऑक्सिजन ५.६ वरून थेट ३.२ एमजीएलपर्यंत घसरतो, तर बीओडी भार ३.० वरून ७.८ एमजीएलपर्यंत वाढून जलचरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो.


खबरदारी व उपाययोजना
या सर्व पर्यावरणीय आव्हानांवर मात करण्यासाठी अहवालात एक स्पष्ट आणि टप्प्याटप्प्याने अमलात आणायचा कृती आराखडा सुचवण्यात आला आहे.
- २८ टक्के असलेली अ-उत्पन्न पाण्याची गळती स्मार्ट मीटरिंग आणि जुन्या पाइपलाइनच्या दुरुस्तीद्वारे कमी करणे
- सर्व नवीन निवासी इमारतींसाठी पावसाचे पाणी साठवणे आणि पुनर्भरण खड्डे सक्तीचे करणे
- प्रक्रिया केलेले सांडपाणी बागा, रस्ते झाडणे, बांधकाम आणि औद्योगिक वापरासाठी पुनर्वापर करून पिण्याच्या पाण्याची बचत करणे
- निळे-हरित क्षेत्राकरिता देशी वृक्षारोपण
- वॉर्ड ८, १० आणि १२ यांसारख्या कमी वृक्षाच्छादन असलेल्या भागांत तातडीने स्थानिक व देशी प्रजातींची कडुनिंब, पिंपळ, वडासारखी झाडे लावणे
- खाड्या, कांदळवन आणि नैसर्गिक नाले यांना मोकळी जमीन न मानता नैसर्गिक पूरप्रतिबंधक यंत्रणा म्हणून जपून ठेवणे व त्यांच्याभोवती स्पष्ट बफर झोन राखणे
- छतांवर परावर्तक रंग, उभी बागाईत आणि पाणी झिरपणारे पृष्ठभाग तयार करून शहरी उष्णता कमी करणे
- सर्व बांधकाम क्षेत्रांवर हिरवे कापड/पडदे लावणे, पाणी फवारणी करणे आणि उघड्यावर कचरा व राडारोडा टाकणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करणे
- धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी यांत्रिक झाडू गाड्यांचा वापर वाढवणे
- ई-वाहन चार्जिंग पायाभूत सुविधा उभारणे आणि सार्वजनिक बस वाहतुकीचे जाळे बळकट करून खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करणे
- घरोघरी ३-कचरापेटी प्रणालीद्वारे (ओला, सुका व घरगुती घातक) १०० टक्के कचरा वेगळा संकलित करणे
- बांधकाम आणि पाडकाम राडारोडा विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र समर्पित प्रक्रिया प्रकल्प उभारणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com