करंजाडे ते पनवेल रस्ता झालाय डोकेदुखीचा कहर

करंजाडे ते पनवेल रस्ता झालाय डोकेदुखीचा कहर
Published on: 

करंजाडे-पनवेल प्रवास ठरतोय डोकेदुखी
पाच मिनिटांच्या प्रवासासाठी चक्क दीड ते दोन तास ः कोंडीत गुदमरतोय प्रवाशांचा जीव
वडघर पूल वाहतुकीसाठी की वाहनचालकांच्या मनमानीसाठी? वाहतूक पोलिसही फाईन मारून हरले
नवीन पनवेल, ता. ११ (बातमीदार) : करंजाडे ते पनवेलदरम्यानचा प्रवास सध्या वाहनचालक आणि प्रवाशांसाठी प्रचंड मनस्तापाचा ठरत आहे. अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना चक्क दीड ते दोन तास कोंडीत अडकून राहावे लागत असून, प्रवाशांचा जीव अक्षरशः गुदमरत आहे. वडघर पुलावर रिक्षाचालक, दुचाकीस्वार आणि चारचाकी चालकांची सुरू असलेली मनमानी, वाहतूक शिस्तीचा झालेला बोजवारा आणि प्रशासनाचा हतबलपणा यामुळे हा मार्ग प्रवाशांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय बनला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित नागरिकांचे पुनर्वसन याच मार्गावर करण्यात आल्यामुळे करंजाडे परिसरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षाचालक आणि वाहनचालक दादागिरीची भाषा करून या मार्गावर कोंडीत भर घालत आहेत. नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करून आणि दंड ठोकूनही वाहतूक पोलिस हतबल झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. अशात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या मार्गावरील वाहनांची संख्या भविष्यात आणखी वाढणार आहे. हे लक्षात घेऊन पालिकेच्या हद्दीतील भूखंड क्रमांक ५०६, पनवेल बाजूने करंजाडे मलनिस्सारण उदंचन केंद्राजवळ गाढी नदीवर नवीन पूल उभारण्याची योजना आखली जात आहे. या पुलामुळे पनवेल शहर, करंजाडे व वडघर येथील सिडको वसाहतीतील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होणार असला तरी करंजाडेकडे जाणाऱ्या सध्याच्या पुलावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून, अनेकदा कोंडी होत असते.

या प्रस्तावानुसार चार लेनचा, २४० मीटर लांबीचा आणि २१.५ मीटर रुंदीचा पूल उभारण्यात येणार आहे. पुलाच्या पूर्वेकडे पनवेल पालिकेचा ४० फूट रस्ता असून, पश्चिमेकडे सिडकोच्या करंजाडे नोडकडे २० मीटर रुंद रस्ता आहे. या दोन्ही रस्त्यांना जोडल्याने परिसरातील वाहतूक सुलभ होईल व भविष्यातील वाढत्या रहदारीला दिशा मिळेल. या पूल बांधकामासाठी सिडको, जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून अनुक्रमे ना हरकत प्रमाणपत्रे मागविण्यात आली आहेत.
- राजेश कर्डिले, अभियंता, बांधकाम विभाग, पनवेल महापालिका

(फोटो) : वाहतूक कोंडीचे फोटो तसेच पालिकेकडून दुसऱ्या पुलाच्या उभारणीचे फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com