घटस्थापनेच्या मंगल पर्वानी भक्तिरसात मंत्रमुग्ध

घटस्थापनेच्या मंगल पर्वानी भक्तिरसात मंत्रमुग्ध
Published on: 

घटस्थापनेच्या मंगल पर्वानी भक्तिरसात मंत्रमुग्ध
पनवेलसह विविध नोड्समध्ये श्री नवदुर्गेची प्रतिष्ठापना!
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ ः आदिशक्तीच्या भक्तीचा आणि उत्साहाचा उत्सव असलेला नवरात्रोत्सव पनवेल पालिका क्षेत्रात मोठ्या भक्तिभावात, जल्लोषात आणि पारंपरिक उत्साहात साजरा केला जात आहे. पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, खारघर आणि तळोजा या सर्वच प्रमुख नोड्समध्ये विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे, सांस्कृतिक संस्था आणि गृहनिर्माण संस्थांतर्फे श्री नवदुर्गा देवीची देखणी व आकर्षक रूपे विराजमान केली आहेत. भक्तिमय गाणी, गरब्याचा ठेका, विद्युत रोषणाई आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण पनवेल परिसर आदिशक्तीच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.
पनवेल शहर आणि बाजारपेठ भागात पारंपरिक पद्धतीनुसार मोठ्या श्रद्धेने देवीची प्रतिष्ठापना केली आहे. श्री सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, लाइन आळी (पनवेल) आणि मिडल क्लास सोसायटी नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीने यंदाही आकर्षक मखर आणि विद्युत रोषणाईत श्री देवीची मूर्ती स्थापन केली आहे. याशिवाय बल्लाळेश्वर मंदिर परिसर, हुतात्मा स्मारक चौक आणि कोळीवाडा परिसर या ठिकाणी स्थानिक मित्र मंडळे व रहिवाशांच्या संयुक्त विद्यमाने आदिशक्तीची भक्तिभावाने स्थापना झाली असून, येथे रोज रात्री महाआरती, भजनाचे कार्यक्रम व पारंपरिक गोंधळ-जागर आयोजित केले जात आहेत. नवीन पनवेलमधील विविध सेक्टर्समध्ये आदिशक्तीची रूपे विराजमान झाली आहेत. श्री सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, सेक्टर १५ व १६ (नवीन पनवेल)तर्फे मंडप उभारून जगदंबेची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच सेक्टर १, ६, १० आणि १९ मधील विविध नागरिक मंडळे व क्रीडा संस्थांतर्फे दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, भक्तीसोबतच रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी आणि स्वच्छता जनजागृती यांसारख्या सामाजिक उपक्रमांवर भर दिला जात आहे. खांदा कॉलनी परिसरात खांदेश्वर सार्वजनिक नवरात्रोत्सव समिती, सेक्टर १ आणि श्री नवदुर्गा उत्सव मंडळ, सेक्टर १२ यांच्या वतीने देवीची भव्य स्थापना करण्यात आली आहे. खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसर आणि सर्व्हिस रोड लगतच्या विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महिला मंडळांनी एकत्र येत घटस्थापना केली आहे. येथे दररोज सायंकाळी भक्तीसंगीताचे आयोजन आणि रात्री लहान मुलांसाठी व महिलांसाठी पारंपरिक गरबा-दांडियाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. कामोठे वसाहतीत श्री नवदुर्गा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, सेक्टर ६ व ११ आणि मानसरोवर सार्वजनिक उत्सव समिती, सेक्टर २१ यांच्यातर्फे आदिशक्तीची मनमोहक रूपे स्थापन करण्यात आली आहेत. कामोठे नोडमधील बहुतांश सोसायट्यांमध्ये रहिवासी कल्याणकारी संस्थांतर्फे देवीची स्थापना करून महापूजा, होम-हवन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कामोठे एमजीएम रुग्णालय मार्ग आणि मुख्य रस्त्यांवर आकर्षक कमानी व दिव्यांची रोषणाई केली आहे.

खारघरमध्ये देखावे अन् जंगी उत्सव
खारघर नोडमध्ये उत्सव चौक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, खारघर, श्री जगन्नाथ सांस्कृतिक मंडळ, सेक्टर १२ आणि सेक्टर ३४-३५ संयुक्त नवरात्रोत्सव समितीद्वारे देवीची प्रतिष्ठापना झाली आहे. भाजपतर्फे मधु पाटील प्रतिष्ठान व प्रवीण पाटील स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यातर्फे नमो दांडियाचे आयोजन केले असून, देवीची स्थापना केली आहे. खारघरमधील मध्यवर्ती उत्सव चौकात आणि हिरानंदानी संकुलाच्या आसपास मोठ्या प्रमाणावर मंडप व नयनरम्य विद्युत रोषणाई पाहण्यास मिळत आहे. तळोजा फेज २ मधील सिडको वसाहती तसेच तळोजा नागरी वसाहत व एमआयडीसी परिसरात श्री तुळजा भवानी सार्वजनिक उत्सव मंडळ, तळोजा आणि तळोजा रहिवाशी संयुक्त नवरात्रोत्सव समितीतर्फे आदिशक्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com