आदिशक्तीच्या भक्तीत न्हाली नवी मुंबई!

आदिशक्तीच्या भक्तीत न्हाली नवी मुंबई!
Published on: 

आदिशक्तीच्या भक्तीत न्हाली नवी मुंबई!
दिघा ते बेलापूरपर्यंत आकर्षक देखावे अन् रोषणाईचा झगमगाट
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ ः आदिशक्ती जगदंबेच्या भक्तीचा, आदराचा आणि उल्हासाचा उत्सव असलेला नवरात्रोत्सव नवी मुंबई शहरात मोठ्या धूमधडाक्यात आणि पारंपरिक श्रद्धा-उत्साहात साजरा होत आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दिघा ते बेलापूर या संपूर्ण परिसरात सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे, सांस्कृतिक संस्था, स्थानिक उत्सव समित्या आणि विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या वतीने श्री नवदुर्गा देवीची अत्यंत मनमोहक व भव्य रूपे विराजमान झाली आहेत. नयनरम्य विद्युत रोषणाई, धार्मिक-सामाजिक विषयांवरील जिवंत देखावे, गरब्याचा ठेका आणि भक्तिसंगीताच्या सुरांनी संपूर्ण नवी मुंबई दुमदुमून गेली आहे.
नवी मुंबईच्या उत्तर वेशीवर असलेल्या दिघा आणि ऐरोली परिसरात सार्वजनिक मंडळांच्या वतीने प्रेक्षणीय देखाव्यांची उभारणी करण्यात आली आहे. ऐरोली सेक्टर ३, ५ आणि ८ मधील प्रमुख नवरात्रोत्सव मंडळांनी प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या प्रतिकृती केदारनाथ धाम आणि अयोध्येचे श्रीराम मंदिर साकारणारे भव्य देखावे उभारले आहेत. घणसोली नोडमध्ये सेक्टर ७, ११ आणि गावठाण भाग मुख्य प्रवेशद्वारांवर उभारण्यात आलेल्या विशाल कमानी आणि लखलखत्या रोषणाईने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथे भक्तिसंगीतासोबतच दांडिया रासची मोठी धूम पाहायला मिळत आहे. नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यात मोडणाऱ्या महापे, पावणे आणि तुर्भे परिसरात कामगार, व्यावसायिक आणि स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत आदिशक्तीची भक्तिभावाने स्थापना केली आहे. महापे व पावणे गावातील सार्वजनिक उत्सव मंडळांनी पारंपरिक पद्धतीनुसार मखर सजावट करून श्री दुर्गेची प्रतिष्ठापना केली आहे. तुर्भे नाका, जनता मार्केट आणि तुर्भे स्टोअर परिसरात मंडप उभारून महाआरती, भजन आणि लोककलांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
नवी मुंबईची मध्यवर्ती आकर्षणे मानल्या जाणाऱ्या कोपरखैरणे आणि वाशी नोड्समध्ये नवरात्रोत्सव अत्यंत भव्य स्वरूपात साजरा होत आहे. कोपरखैरणे सेक्टर ५, ११ आणि १५ मधील मंडळांनी समाजप्रबोधनात्मक पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण या विषयांवर आधारित देखावे उभारले आहेत. तर वाशी सेक्टर १७, वाशी प्लाझा आणि सेक्टर २९ परिसरात नेत्रदीपक विद्युत रोषणाई आणि भव्य मंडपांची उभारणी झाली आहे. वाशी येथे अनिल कौशिक समाजिक प्रतिष्ठानतर्फे नवदुर्गा उत्सव साजरा करण्यात येत आहे. गुफा तयार करण्यात आली असून देवीची ११ शक्तिपीठे साकारण्यात आली आहेत. कोपरखैरणेत पारंपरिक महाराष्ट्रीय उत्सवाबरोबरच गरबा-दांडिया आणि बंगाली दुर्गापूजेचा (दुर्गा उत्सव) सुंदर सांस्कृतिक मिलाफ पाहायला मिळत आहे.

महिला मंडळांची घटस्थापना
सानपाडा आणि जुईनगर नोड्समधील उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील सोसायट्या आणि स्थानिक मंडळांमधील कौटुंबिक व जिव्हाळ्याचे वातावरण. सानपाडा सेक्टर १ ते ५ आणि जुईनगर सेक्टर्समधील गृहनिर्माण संस्थांच्या प्रांगणात महिला मंडळांनी एकत्र येत घटस्थापना केली आहे. येथे लहान मुलांसाठी धार्मिक-सांस्कृतिक स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर, भोंडला आणि रात्री पारंपरिक गरब्याचे आयोजन केले जात आहे. पर्यावरणपूरक सजावटीवर या भागातील मंडळांनी विशेष भर दिला आहे.

नेरूळ, सीवूड्स आणि बेलापुरात हायटेक देखावे, अथांग गर्दी आणि गरबा नाईट्स
नवी मुंबईतील दक्षिणेकडील नोड्समध्ये उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नेरूळ सेक्टर ६, १५, २१ व जुने नेरूळ नोडमध्ये सार्वजनिक मंडळांनी उभारलेले अवाढव्य देखावे पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सीवूड्स येथे ग्रँड सेंट्रल परिसर, सेक्टर ४० आणि सीबीडी बेलापूर सेक्टर १५, २६ व बेलापूर गावठाण या भागात हायटेक लायटिंग शो, लेझर लाईट्सच्या कमानी आणि डीजे व ऑर्केस्ट्रा गरबा नाईट्सचे आयोजन करण्यात आले आहे. बेलापूर येथील सार्वजनिक मंडळांनी पौराणिक कथांवर आधारित डिजिटल व थ्रीडी देखावे साकारून उपनगरातील नागरिकांना भुरळ घातली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com