

जोगेश्वरीत पोषण माह उत्साहात साजरा
जोगेश्वरी, ता. ११ (बातमीदार) ः महिला व बालविकास विभागांतर्गत जोगेश्वरी नागरी प्रकल्पाच्या वतीने नवव्या पोषण माह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जोगेश्वरी पूर्व येथील दुर्गानगरमधील सुखसागर संकुलात गुरुवारी (ता. ८) झालेल्या या कार्यक्रमात जोगेश्वरी-अंधेरी विभागातील सुमारे ३५० अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या. पौष्टिक आहार, बालकांचा सर्वांगीण विकास आणि किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण याबाबत सांस्कृतिक कार्यक्रमांतून जनजागृती करण्यात आली.
आमदार बाळा नर, नगरसेवक कैलास पाठक, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार, प्रकल्प अधिकारी योगिता जोशी आणि मुख्य सेविका हलीमा खान यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मजासवाडी बीटच्या वतीने लेझीमच्या तालावर पोषण दिंडी काढण्यात आली. तसेच कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व टिपरी नृत्यातून मांडण्यात आले. प्रतापनगर बीटने पोषणविषयक पथनाट्य व पोषण आरती सादर केली. मरोळ बीटच्या नाटिकेतून अंगणवाडीच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. बांद्रा प्लॉट बीटने मंगळागौर, तर श्यामनगर बीटने किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणावर आधारित गीत सादर केले. बिंद्रा कॉम्प्लेक्स बीटच्या सेविकांनी फळे, भाज्या, कडधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असलेला पौष्टिक आहाराचा रांगोळी पिरॅमिड साकारला. चिमुकला ढोलकीवादक कुमार स्वरूप याचे ढोलकीवादन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. पालक आणि लहान मुलांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा दळवी आणि मनाली घाग यांनी केले. पोषण, बालविकास आणि किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला, अशी माहिती शिवाजी खैरनार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.