

पनवेलमधील स्वयंपुनर्विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात
सुधामंजिरी सोसायटीच्या पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन
प्रवीण दरेकर यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल, ता. ११ (बातमीदार) ः पनवेलमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी स्वयंपुनर्विकासाच्या चळवळीला शासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल. आवश्यक अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासोबतच परवानग्यांच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली. पनवेलमधील पहिल्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा सुधामंजिरी सोसायटी येथे त्यांच्या हस्ते पार पडला. या वेळी आमदार विक्रांत पाटील, पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचे पालकत्व स्वीकारल्यामुळे पनवेलसह राज्यातील या चळवळीला चालना मिळत असल्याचे दरेकर यांनी नमूद केले. स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून सोसायटीचे सभासद स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास करू शकतात. त्यामुळे पारंपरिक पुनर्विकास प्रक्रियेत विकासकाला मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा किंवा अतिरिक्त जागेचा फायदा सभासदांना मिळण्याची संधी निर्माण होते. यामुळे रहिवाशांना अधिक प्रशस्त घरे आणि आधुनिक सुविधा मिळण्यास मदत होऊ शकते.
पनवेल परिसरात सिडकोने सर्वप्रथम कळंबोली आणि नवीन पनवेल या वसाहती विकसित केल्या. त्यानंतर खारघर आणि कामोठे परिसराचा विस्तार झाला. या भागांतील अनेक इमारती आता जुन्या झाल्या असून, काही ठिकाणी स्लॅब कोसळणे, भिंतींना तडे जाणे आणि पावसाळ्यात गळती लागणे अशा समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या इमारतींचा पुनर्विकास व्हावा आणि रहिवाशांना वाढीव चटई क्षेत्रफळ मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सुधामंजिरी सोसायटीच्या प्रकल्पामुळे पनवेलमधील इतर जुन्या सोसायट्यांनाही स्वयंपुनर्विकासाचा पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. या उपक्रमातून सुरक्षित इमारती, प्रशस्त घरे आणि रहिवाशांचा आर्थिक सहभाग यांना प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे पनवेलमधील स्वयंपुनर्विकासाच्या प्रक्रियेला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
स्वयंपुनर्विकासासाठी पनवेलमध्ये स्वतंत्र कक्ष
पनवेलमधील जुन्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाला गती देण्यासाठी विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या सोसायट्यांना आवश्यक परवानग्या, प्रशासकीय प्रक्रिया आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच, राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जसुलभतेसाठी मदत करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सोसायट्यांना स्वयंपुनर्विकासाची प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
सुधामंजिरी सोसायटीच्या सभासदांचे विशेष आभार मानतो. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर त्यांनी स्वयंपुनर्विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी स्वयंपुनर्विकासाची संकल्पना पुढे नेऊन सोसायट्यांना आधार दिला आहे. या प्रकल्पामुळे पनवेलमधील इतर सोसायट्यांनाही प्रेरणा मिळेल. पनवेलकरांच्या वतीने या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
- विक्रांत पाटील, आमदार, विधान परिषद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंपुनर्विकासाच्या चळवळीचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यामुळे पनवेलसह संपूर्ण राज्यातील स्वयंपुनर्विकासाला गती मिळणार आहे. पनवेलमध्ये आमदार विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वयंपुनर्विकास कक्ष स्थापन करण्यात येईल. पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या सोसायट्यांना परवानग्यांसाठी मंत्रालयात वारंवार जाण्याची गरज भासू नये, यासाठी स्थानिक पातळीवर मदत उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जसुलभतेसाठी आवश्यक सहकार्य केले जाईल. या प्रक्रियेत मी स्वतः लक्ष घालणार असून, शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देऊ.
- प्रवीण दरेकर, अध्यक्ष, स्वयंपुनर्विकास प्राधिकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.