महिला, बालकांसाठी योजनांची माहिती एका छताखाली

महिला, बालकांसाठी योजनांची माहिती एका छताखाली
Published on: 

बदलापूर, ता. १२ (बातमीदार) : शासकीय योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी, तक्रार निवारणाची प्रक्रिया आणि महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांची माहिती मिळावी, या उद्देशाने बदलापूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांच्या पुढाकारातून ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत विशेष मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. बेलवली येथील अनंत भवनमध्ये झालेल्या या शिबिराला शंभरहून अधिक महिलांनी प्रतिसाद दिला.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिरात महिला व बालकांचे हक्क, शासकीय योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया आणि तक्रारींचे निराकरण याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिशन वात्सल्य, मिशन शक्ती, अंगणवाडी सेवा, मातृत्वविषयक योजना आणि एकल पालकांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय सुविधांची माहिती दिली. याप्रसंगी परिविक्षा अधिकारी सुनंदा मराठे, बाल संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव, अंबरनाथ तालुका संरक्षण अधिकारी भाग्यश्री बच्छाव, चाइल्ड लाइन प्रतिनिधी कोणिका रणदिवे आणि अंगणवाडी मुख्य सेविका अस्मिता तुरटे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी मागासवर्गीय सभापती तथा नगरसेविका हर्षली गायकवाड, नगरसेविका सुगंधा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी संगीता चेंदवणकर यांच्यासह महिला व बाल विकास विभाग, पोलिस विभाग आणि संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

लाडकी बहीणबाबत मार्गदर्शन
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ काही महिन्यांपासून बंद झालेल्या किंवा अद्याप लाभ न मिळालेल्या महिलांना संबंधित विभागाकडे चौकशी कशी करावी, लाभ बंद होण्यामागील कारणे कशी जाणून घ्यावीत आणि वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सायबर सुरक्षेबाबत जागृती
महिला व बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सायबर सुरक्षेवरही मार्गदर्शन करण्यात आले. सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक मनीष वाघमारे यांनी ऑनलाइन फसवणूक, डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे व कुटुंबीयांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.

निवारा केंद्राची माहिती
संकटात सापडलेल्या बालकांसाठी १०९८ ही बालसाहाय्य दूरध्वनी सेवा, महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी अंबरनाथ येथील केंद्र आणि पीडित महिलांना निवारा, समुपदेशन व मदत उपलब्ध करून देणाऱ्या वन स्टॉप सखी केंद्राच्या कार्याची माहितीही देण्यात आली.


MUM26F54682

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com