

गुंफेत वसली योगेश्वरी देवी
जोगेश्वरी, ता. १२ (बातमीदार) : मुंबईच्या प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा भाग असलेल्या जोगेश्वरी गुंफेतील देवी योगेश्वरीचे पूजास्थान नवरात्रोत्सवात भाविकांच्या उपस्थितीमुळे गजबजते. देवी पार्वतीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि नवसाला पावणारे श्रद्धास्थान, अशी देवीची भाविकांमध्ये ओळख आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांतील तसेच गुजरातमधील काही समाजघटकांतील भाविकही देवीची श्रद्धेने पूजा करतात. साधारण सहाव्या शतकात निर्माण झाल्याचे मानले जाणारे हे शैलगृह ऐतिहासिक नोंदींमध्ये ‘आंबोली गुंफा’ या नावानेही ओळखले जाते. दगडात कोरलेले विशाल सभागृह, अनेक खांब आणि विविध देवतांची शिल्पे ही गुंफेची वैशिष्ट्ये आहेत. वास्तुरचना आणि शिल्पांवरून या गुंफेचा संबंध प्रामुख्याने शैव परंपरेशी असल्याचे मानले जाते. येथे शिव-पार्वती, नटराज, गणेश, हनुमान आणि दत्तात्रेय यांच्याशी संबंधित मूर्ती व शिल्पे आढळतात.गुंफेतील मध्यवर्ती पूजास्थानात देवी योगेश्वरीची पूजा केली जाते.
नवरात्रोत्सवात दूरवरून येणारे भाविक देवीची ओटी भरतात. देवीला अर्पण केलेली विविध वस्त्रे तिला नेसविण्यात येतात. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळेल, याचीही काळजी घेतली जाते. महाशिवरात्र आणि नवरात्रोत्सवात गुंफेत विशेष गर्दी असते. रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी दर्शनासाठी लागलेली रांग गुंफेबाहेरपर्यंत पोहोचते. जोगेश्वरीतील स्थानिक रहिवाशांसह अंधेरी आणि गोरेगाव परिसरातील भाविकही मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
मंदिराचे द्वार सकाळी ६ वाजता उघडले जाते आणि रात्री १२ वाजता बंद केले जाते. दिवसभरात दोन वेळा आरती केली जाते. देवीच्या दर्शनाने सुख-समृद्धी लाभावी, या श्रद्धेने भाविक दर्शनासाठी येतात. धार्मिक महत्त्वाबरोबरच प्राचीन स्थापत्य आणि शिल्पकलेचा वारसा जपणाऱ्या या गुंफेचे संवर्धन करणेही महत्त्वाचे आहे.
-संकलन, दिनेश तर्फे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.