करंजाडे ते पनवेल रस्ता झालाय डोकेदुखीचा कहर

करंजाडे ते पनवेल रस्ता झालाय डोकेदुखीचा कहर
Published on: 

करंजाडे ते पनवेल प्रवास ठरतोय डोकेदुखी
पाच मिनिटांच्या प्रवासासाठी चक्क दीड ते दोन तास कोंडीत
नवीन पनवेल, ता. १२ (बातमीदार) : पनवेल ते करंजाडे मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या आता भीषण स्वरूप धारण करत आहे. केवळ पाच मिनिटांच्या प्रवासासाठी सुमारे दीड ते दोन तासांचा वेळ लागत असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे हजारो प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
करंजाडे नोडचा विकास वेगाने होत असतानाच विमानतळ बाधित क्षेत्राच्या पुनर्वसनामुळे वडघर, वरचे ओवळे आणि पुष्पकनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. या भागात लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्यादेखील झपाट्याने वाढल्यामुळे गाढी नदीवरील पुलावर रोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे केवळ दोन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतराला तब्बल दीड ते दोन तास लागत आहे.

कोंडीची प्रमुख कारणे
गाढी नदीवरील सध्याचा पूल : करंजाडे आणि पनवेलला जोडणाऱ्या गाढी नदीवरील पूल अरुंद असल्याने वाहनांची मोठी गर्दी होते.
उरण नाका आणि मासे बाजार : उरण नाका जवळील मासे बाजार आणि तीन आसनी रिक्षांच्या अनधिकृत थांब्यांमुळे एनएमएमटी बस आणि इतर वाहने तासनतास अडकून पडतात.
बेशिस्त चालक ः तीन आसनी रिक्षांच्या बेशिस्त पार्किंगमुळे पनवेल रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागतात. याशिवाय दुचाकीस्वार आणि चारचाकी चालकांच्या मनमानी कारभारामुळे कोंडीत भर पडत आहे. प्रवाशांनी स्वतःहून वाहतूक शिस्त पाळल्याशिवाय आणि प्रशासनाने कडक पावले उचलल्याशिवाय ही डोकेदुखी थांबणार नाही, असे काही नागरिकांनी म्हंटले आहे.

संध्याकाळच्या वेळी रिक्षांची टंचाई
करंजाडे येथील काही ठरावीक सेक्टरमध्ये (सेक्टर १ ते ५) संध्याकाळच्या वेळी शेअरिंग रिक्षा मिळणे कठीण होते आणि उपलब्ध रिक्षाचालक जास्त भाडे आकारत असल्याच्या तक्रारी काही प्रवाशांनी केल्या आहेत. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणीही केली जात आहे.

चार पदरी पुलाचा कोंडीवर उतारा
करंजाडे आणि पनवेल यादरम्यान होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून गाढी नदीवर ४८ कोटी ४० लाख रुपयांच्या चार पदरी नवीन पूल बांधण्यास मान्यता दिली आहे. पनवेल बाजूने करंजाडे मलनिस्सारण उदंचन केंद्राजवळ गाढी नदीवर नवीन पूल उभारला जात आहे. येत्या काही दिवसांतच प्रत्यक्षात हे काम पूर्णत्वास येणार आहे.

करंजाडे-वडघर परिसरात नागरीकरण वेगाने झाले आहे. त्यावर उपाययोजना म्हणून महापालिकेशी चर्चा झाली आहे. येत्या सहा महिन्यांत नव्याने होणाऱ्या पुलाचे लोकार्पण झाल्यानंतर वाहतुकीच्या सर्व अडचणी मार्गी लागतील. सध्या आमचे अधिकारी व कर्मचारी उरणनाका परिसरात तैनात असून, अचानक लागणाऱ्या कोंडीतून मार्ग मोकळा करण्याचे काम करत आहेत.
- सुभाष पुजारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक शाखा

करंजाडे हे आमचे गावच आहे, मात्र आम्ही या गावात जन्म घेतला ही बाब आता आम्हाला खटकत आहे. ही चूक आमची नसून येथील सत्ताधाऱ्यांची आहे. इतके वर्षे यांना दिसत नाही का? आमदारांनी समस्येत लक्ष दिले पाहिजे.
- सुशांत पाटील, प्रवासी, करंजाडे


प्रस्तावानुसार चार लेनचा, २४० मीटर लांबीचा आणि २१.५ मीटर रुंदीचा पूल उभारण्यात येणार आहे. पुलाच्या पूर्वेकडे पनवेल पालिकेचा ४० फूट रस्ता असून, पश्चिमेकडे सिडकोच्या करंजाडे नोडकडे २० मीटर रुंद रस्ता आहे. या दोन्ही रस्त्यांना जोडल्याने परिसरातील वाहतूक सुलभ होईल व भविष्यातील वाढत्या रहदारीला दिशा मिळेल. या पूल बांधकामासाठी सिडको, जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून अनुक्रमे ना-हरकत प्रमाणपत्रे मागविण्यात आली आहे.
- राजेश कर्डिले, अभियंता, बांधकाम विभाग, पनवेल महापालिका

(फोटो) : वाहतूक कोंडीचे फोटो तसेच पालिकेकडून दुसऱ्या पुलाच्या उभारणीचे फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com