

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : दिव्यातील डम्पिंग ग्राउंड बंद झाले, तरी वर्षानुवर्षे साचलेल्या कचऱ्याचे ढिग कायम आहेत. हीच परिस्थिती भंडार्ली क्षेपणभूमीची आहे. या जुन्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी ठाणे महापालिका सुमारे ७९ कोटी खर्च करणार आहे. विशेष म्हणजे, कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केल्यानंतर या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करणे, निविदा प्रक्रिया आणि कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र सल्लागार नेमण्यात आला आहे. या सल्लागाराच्या कामासाठीही सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.
दिवा डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे बंद झाल्यानंतरही जुन्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न सुटलेला नाही. या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करून जमीन पूर्ववत करण्याची आणि त्यानंतर या जागेवर जैवविविधता उद्यान उभारण्याची योजना आहे. त्या दृष्टीने ठाणे पालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रस्तावानुसार, दिवा आणि भंडार्ली येथील सुमारे आठ लाख ३० हजार टन जुन्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी ७८ कोटी ९८ लाख ६७ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी सौराष्ट्र एन्व्हायरो प्रोजेक्ट या कंपनीला कार्यादेश दिला आहे. जुन्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करून पर्यावरणावरील परिणाम कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पासाठी मार्स प्लॅनिंग अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या कंपनीची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करणे, निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करणे, कामाचे नियोजन करणे आणि प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवणे, अशी जबाबदारी या संस्थेवर सोपविण्यात आली आहे.
स्वतंत्र शुल्काची तरतूद
पालिकेच्या प्रस्तावातील खर्चाच्या तपशिलानुसार सल्लागाराच्या विविध कामांसाठी स्वतंत्र शुल्काची तरतूद केली आहे. कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी सुमारे ७९ कोटी खर्च होत असताना नियोजन आणि देखरेखीसाठी स्वतंत्रपणे सुमारे दीड कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. त्यामुळे या सल्लागाराच्या कामाचे स्वरूप, त्याची जबाबदारी आणि प्रत्यक्ष कामाच्या गुणवत्तेवर त्याचा कितपत परिणाम होणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिवावासीयांना दिलासा
दिवा येथील डम्पिंग ग्राउंड बंद झाले, तरीही वर्षानुवर्ष येथे साठलेला कचरा तसाच कायम आहे. या कचऱ्याची दुर्गंधी परिसरात पसरत असून, यापासून कायमची सुटका देण्याची मागणी होत आहे. या ठिकाणी ठाणे महापालिकेचा कचरा टाकला जात होता, ती क्षेपणभूमी खासगी मालकीची असल्याचे समजते. त्यावर तोडगा काढत आधी हा कचरा आहे, तिथेच डम्प करून सपाटीकरण करण्याची योजना आखण्यात आली होती. त्यावर नवी मुंबईच्या धर्तीवर उद्यान उभारण्याची योजनाही आहे. ही योजना प्रत्यक्ष कधी साकार होईल, याची प्रतीक्षा आहे. त्याआधी कचऱ्याचे व्यवस्थापन झाल्यास दिवावासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.