

आदिवासींचे मुंडन आंदोलन
महापालिकेबाहेर उपोषण; २४ मागण्यांवर ठोस निर्णयाची प्रतीक्षा
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप करीत सकल आदिवासी समाजाच्या वतीने सोमवारी (ता. १२) महापालिका मुख्यालयाबाहेर मुंडन आंदोलन करण्यात आले. मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी उपोषण सुरू केले असून, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
महापालिका हद्दीतील स्थानिक आदिवासी समाजाच्या २४ मागण्यांसाठी १७ जुलै २०२६ला प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. आदिवासी कुटुंबांना घरे, स्थानिक युवकांना रोजगार, आदिवासी भवनची उभारणी, आदिवासी पाड्यांचा विकास आणि मूलभूत नागरी सुविधा या प्रमुख मागण्यांचा त्यात समावेश आहे. तसेच आदिवासी विकास निधीच्या विनियोगाची चौकशी आणि विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणीही करण्यात आली.
या मागण्यांसाठी यापूर्वी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर ९ सप्टेंबरला महापालिका प्रशासनासोबत बैठक झाली. संबंधित विभागांना कार्यवाहीच्या सूचना दिल्याचे सांगून प्रशासनाने १० सप्टेंबरचे नियोजित आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. मात्र, २४ मागण्यांवर कोणता विभाग आणि अधिकारी किती कालावधीत कार्यवाही करणार, याबाबतचा ठोस लेखी अहवाल मिळाला नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नवी मुंबई प्रभारी संजय पांडुरंग भवारी यांनी केले. आदिवासी समाजाच्या २४ मागण्यांवर प्रशासनाने तातडीने लेखी आणि कालबद्ध निर्णय घ्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
विकासकामांच्या चौकशीची मागणी
आदिवासी विकासाशी संबंधित विभागांच्या कामकाजाची चौकशी करावी, शहर अभियंता विभागांतर्गत विकासकामांची तपासणी करावी आणि आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण व विकासकामे करताना समाजाच्या प्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्व प्रलंबित मागण्यांवर कालबद्ध निर्णय घेऊन त्याची लेखी माहिती द्यावी, असा आग्रह आंदोलकांनी धरला आहे. प्रशासनाकडून ठोस निर्णय मिळत नसल्याने मुंडन आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. मागण्या मान्य होईपर्यंत महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या देऊन तेथेच स्वयंपाक करून जेवण करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.