

पूर्णेकर हत्या प्रकरण
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बंगल्याबाहेर देणार ठिय्या!
कुटुंबीयांचा एल्गार; सूत्रधारांना अटक करण्याची मागणी
ठाणे, ता. १२ : मानपाडा येथील प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधारांना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप करीत त्यांच्या कुटुंबीयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. हत्येचा कट रचणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर ठिय्या देणार असल्याचे राम पूर्णेकर यांनी सांगितले.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला १३ दिवस उलटूनही कुटुंबीयांचा न्यायासाठीचा लढा सुरू आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींच्या भूमिकेची सखोल चौकशी करून हत्येमागील सूत्रधारांपर्यंत तपास पोहोचवावा, अशी मागणी राम पूर्णेकर यांनी केली. तपासात पारदर्शकता राहावी, यासाठी या प्रकरणाची चौकशी सीबीआय आणि सीआयडीमार्फत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करूनही अद्याप भेट मिळालेली नसल्याचे राम पूर्णेकर यांनी सांगितले. भाजपचे नेते, आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी कुटुंबीयांची भेट घेतली; मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोणीही भेटण्यासाठी आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
.....
पाचव्या आरोपीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणात अटक केलेल्या पाचव्या आरोपीची शरीरयष्टी आणि देहबोली सीसीटीव्ही चित्रणातील हेल्मेटधारी व्यक्तीशी जुळत नसल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला. त्यामुळे सर्व संशयितांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून प्रत्यक्ष आरोपी आणि हत्येमागील सूत्रधारांचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, त्यांच्या राजीनाम्याची किंवा पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.
.....
पाठिंब्याबद्दल आभार
न्यायासाठीच्या लढ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, मनसे नेते अविनाश जाधव, आगरी समाजबांधव आणि विविध आगरी संघटनांनी पाठिंबा दिल्याबद्दल राम पूर्णेकर यांनी आभार मानले. पत्रकारांनी या प्रकरणाला प्रसिद्धी दिल्यामुळे हा मुद्दा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी नमूद केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.