घोडबंदरला आधुनिक सिग्नल

घोडबंदरला आधुनिक सिग्नल
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : घोडबंदर मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी मुख्य मार्गात सेवा रस्ता एकत्रित करण्यात आला आहे. त्यामुळे घोडबंदर मार्ग आता अधिक प्रशस्त झाला असला तरीही कोंडीची समस्या मात्र अद्यापि कायम आहे. रुंदीकरणानंतर कालबाह्य झालेली येथील सिग्नल यंत्रणा कोंडीत भर घालत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने पातलीपाडा ते नागलाबंदरदरम्यान सहा जंक्शनवर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायमरी सेकंडरी या यंत्रणेमुळे चालकांना लांबूनच सिग्नलची स्थिती स्पष्टपणे समजण्यास मदत होणार आहे.

घोडबंदर मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मुख्य रस्ता आणि सेवा रस्ते एकमेकांना जोडण्याचे काम सुरू आहे. या बदलामुळे रस्त्याची रुंदी वाढली असून, काही ठिकाणी रस्त्याची सुरुवात आणि शेवटची रचना बदलली आहे, मात्र रस्त्याच्या नव्या रचनेच्या तुलनेत पूर्वीपासून असलेली सिग्नल यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. कमी उंचीचे सिग्नल दूरवरून स्पष्ट दिसत नसल्याने वाहनचालकांना चौकात पोहोचेपर्यंत सिग्नलची स्थिती लक्षात येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच सिग्नल यंत्रणेतही बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणून ठाणे महापालिकेने सिग्नल यंत्रणेत सुधारणा करण्याचे नियोजन केले आहे.

रस्त्याच्या नव्या रचनेनुसार सिग्नलची उंची आणि मांडणी अशी असेल, ज्यामुळे वाहनचालकांना दूरवरूनही सिग्नल दिसू शकतील, मात्र ही अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी ठाणे महापालिकेला ठेकेदाराच मिळत नव्हता. सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी महापालिकेने तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवली. पहिल्या प्रयत्नात दोन कंपन्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्याने त्यांच्या निविदा बाद झाल्या. दुसऱ्या प्रयत्नात एकच निविदा प्राप्त झाली. त्यामुळे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. त्यात दोन कंपन्यांनी सहभाग घेतला होता. ट्रॅफिकटेक सोल्यूशन या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

तीन कोटींचा खर्च
या कामासाठी वस्तू व सेवा करासह सुमारे तीन कोटी चार लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च ‘डिपॉझिट वर्क’अंतर्गत केला जाणार आहे. आयुक्तांनी २९ सप्टेंबरला प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने हा प्रस्ताव सभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

सहा जंक्शनवर आधुनिक व्यवस्था
पातलीपाडा जंक्शन, विजय गार्डनजवळील डी-मार्ट परिसर, आनंदनगर जंक्शन, कासारवडवली जंक्शन, ओवळा जंक्शन आणि नागलाबंदर जंक्शन या सहा ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुधारण्यात येणार आहे. सध्या सिग्नल असलेल्या ठिकाणीच ही व्यवस्था उभारण्यात येणार आहे. प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन स्तरांवर सिग्नलची मांडणी केल्यामुळे चौकापासून दूर असलेल्या वाहनचालकांनाही सिग्नलची स्थिती स्पष्टपणे दिसण्यास मदत होईल.

घोडबंदर मार्गावरील ज्या चौकांची कामे पूर्ण झाली आहेत, तेथे प्रथम सिग्नल यंत्रणा सुधारण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित जंक्शनवर टप्प्याटप्प्याने काम केले जाईल. सिग्नलची जागा, आराखडा वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याकडून मंजूर करण्यात येत आहे. त्यानुसार आता या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
- शुभांगी केशवानी,
उपनगर अभियंता, विद्युत विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com