

‘मरण आले तरी चालेल, पण जमिनी देणार नाही’
अतिरिक्त तळोजा एमआयडीसीच्या भूसंपादनाविरोधात शेतकरी आक्रमक
पनवेल, ता. १३ (बातमीदार) ः अतिरिक्त तळोजा औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक २ साठी प्रस्तावित भूसंपादनाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, आपल्या हक्काच्या जमिनी वाचविण्यासाठी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. मौजे महोदर, चिंचवली आणि चिंध्रण येथील खासगी जमिनींच्या भूसंपादनाला विरोध दर्शविण्यासाठी येत्या १६ ऑक्टोबर रोजी शेतकरी मोठ्या संख्येने प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत. ‘मरण आले तरी चालेल, पण जमिनी देणार नाही,’ असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाअन्वये प्रस्तावित भूसंपादनाची अधिसूचना १५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेच्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांना वैयक्तिक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी २ सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या हरकतींवर शुक्रवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. यादरम्यान शेतकरी आपल्या हरकती, मागण्या आणि भूसंपादनाबाबतच्या आक्षेपांची मांडणी करणार आहेत. त्यामुळे १६ ऑक्टोबरची सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार असून, प्रशासन शेतकऱ्यांच्या हरकतींवर कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
पुढील पिढ्यांच्या भविष्याचा आधार
शासनाने शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या जमिनींचे भूसंपादन करू नये, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. शेती ही केवळ उत्पन्नाचे साधन नसून अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. जमिनी गेल्यास शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम होण्याबरोबरच पुढील पिढ्यांच्या भविष्याचाही प्रश्न निर्माण होईल, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक विजय खानावकर व शेतकऱ्यांना ॲड. राहुल ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. चिंचवली येथील लहू मुंढे, तसेच कुत्तरपाडा येथील समाधान आदईकर आणि कैलास आदईकर यांच्यासह संबंधित परिसरातील शेतकरी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी एकवटले आहेत.