

भिवंडी, ता. १३ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून नऊ झाल्याने इच्छुकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. मात्र, उमेदवारांच्या नावांवरून काँग्रेस आणि समाजवादी पक्षात मतभेद उफाळले असून, पक्षाच्या अधिकृत निर्णयाला डावलून नावे सुचविल्याचे आरोप होत आहेत. दुसरीकडे, भाजप, शिवसेना आणि कोणार्क विकास आघाडीने उमेदवारांच्या नावांबाबत भूमिका स्पष्ट केल्याने १४ ऑक्टोबरला होणाऱ्या निवड प्रक्रियेपूर्वीच महापालिकेतील राजकीय वातावरण तापले आहे.
भाजपने शहराध्यक्ष रवी सावंत आणि सुगंधा टावरे यांच्या नावांना पसंती दिली आहे. शिवसेनेने अनेक इच्छुक असतानाही निष्ठावंत संजय काबुकर यांच्या नावावर सहमती दर्शवली. कोणार्क विकास आघाडीकडून माजी महापौर विलास आर. पाटील यांनी त्यांचे पुत्र मयूर पाटील यांच्या नावाला पसंती दिली आहे. मात्र, काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या निवडीवरून वाद निर्माण झाला आहे. समाजवादीचे गटनेते आरिफ याकूब अन्सारी यांनी भरत जंगलानी यांच्या नावाची शिफारस केली आहे. जंगलानी हे भाजपचे आमदार महेश चौघुले यांचे समर्थक म्हणून ओळखले जात असल्याने पक्षात नाराजी व्यक्त होत आहे. समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी सरफराज ऊर्फ बाबू खान यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा उमेदवार घोषित करणारा पक्षादेश काढला होता. मात्र, गटनेत्याने दुसऱ्याच नावाची शिफारस केल्याने पक्षांतर्गत संघर्ष उफाळला आहे.
समाजवादीचे शहराध्यक्ष रियाज आझमी यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाच्या सहापैकी चार नगरसेवकांनी बाबू खान यांच्या नावाला सहमती दर्शवली आहे. गटनेत्याने सुचविलेल्या दुसऱ्या नावाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली असून यासंदर्भात आयुक्तांकडे विचारणा करण्यात येणार आहे. गरज पडल्यास कायदेशीर लढा दिला जाईल, असे आझमी यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसमध्ये तीन नावांवरून वाद
काँग्रेसला तीन स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याची संधी असताना गटनेते तथा उपमहापौर तारीक मोमिन यांनी इम्रान मोहम्मद एच. अन्सारी, अरफात ए. शेख आणि सलीम अहमद शेख यांच्या नावांची शिफारस केली आहे. मात्र, या नावांना काँग्रेसमधूनच विरोध होत आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आबिद मुनसफ खान यांनी उपमहापौर तारीक मोमिन यांना पत्र लिहून शिफारस केलेली तिन्ही नावे मागे घेण्याची आणि १४ ऑक्टोबरला होणारी स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला पाठविलेल्या अधिकृत यादीत या नावांचा समावेश नसल्याचा आरोप आबिद खान यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.