

पेणमध्ये अनधिकृत हातगाड्यांवर पालिकेची कारवाई
अंतोरे रोडवरील अतिक्रमण हटवून रस्ता केला मोकळा; नागरिकांकडून स्वागत
पेण, ता. १३ (वार्ताहर) : पेण शहरातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यावर नगरपालिकेने भर दिला आहे, मात्र शहरातील काही भागांत फळे, फुले आणि भाजीपाला विक्री करणाऱ्या अनधिकृत हातगाड्यांची संख्या वाढल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पेण नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज अंतोरे रोडवरील अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत रस्ता मोकळा केला. या कारवाईचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेण नगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्यांवर अनधिकृतपणे हातगाड्या लावल्या जात असल्याने वाहतूक कोंडी होत होती. तसेच सुरू असलेल्या विकासकामांनाही अडथळे निर्माण होत होते. याबाबत संबंधित हातगाडीधारकांना पूर्वसूचना देण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागाने प्रत्यक्ष कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
मुख्याधिकारी जीवन पाटील आणि बांधकाम रचनाकार यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाचे अधिकारी महेश वडके, कर्मचारी कमलाकर आवस्कर आणि अन्य पालिका कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईमुळे अंतोरे रोडवरील अतिक्रमण हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
विकासकामांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन
पेण नगरपालिका हद्दीत अनधिकृत हातगाड्यांमुळे मुख्य रस्त्यांवर वाहनचालक आणि पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात रस्त्यांचे काँक्रीटीकरण, रुंदीकरण आणि गटारांची कामे सुरू असल्याने नागरिकांनी तसेच हातगाडीधारकांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन बांधकाम रचनाकार सुहास कांबळे यांनी केले.
नियमित वाहतूक सुरळीत राहावी आणि शहरातील विकासकामे विनाअडथळा पूर्ण व्हावीत, यासाठी अनधिकृत अतिक्रमणांविरोधातील कारवाई आवश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.