नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा नवा घाट

नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा नवा घाट
Published on: 

नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा नवा घाट
विष्णुदास भावे व्यासपीठाची दुरवस्था; पुन्हा कोटींचा खर्च
नेरूळ, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबईकरांचे सांस्कृतिक वैभव आणि नाट्यकर्मींचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिका तब्बल चार कोटी ६५ लाख रुपये खर्च करणार आहे. अंतर्गत सजावट, कार्यालये, व्हीआयपी कक्ष आणि कलाकारांच्या सुविधांच्या नूतनीकरणासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. मात्र, काही वर्षांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्चून अद्ययावतीकरण केलेल्या नाट्यगृहाची सहा वर्षांच्या आतच दुरवस्था झाल्याने आधीच्या कामांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नव्या कामांवर पुन्हा कोट्यवधींचा खर्च करण्यापूर्वी जुन्या कामांची चौकशी होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नाट्यगृहाच्या लाकडी सजावटीला वाळवी लागल्याचे समोर आले असून, लाकडाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करून केलेल्या कामांची दुरवस्था इतक्या कमी कालावधीत कशी झाली, याचे उत्तर प्रशासनाने देणे अपेक्षित आहे. आधीच्या कामांची गुणवत्ता तपासली जाणार की नव्या प्रस्तावाला मंजुरी देऊन पुन्हा खर्चाचा भार महापालिकेच्या तिजोरीवर टाकला जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या डागडुजी आणि अद्ययावतीकरणासाठी यापूर्वीही कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. असे असताना व्हीआयपी कक्ष, कलाकारांच्या मेकअप रूम, चेंजिंग रूम, तिकीटबारी आणि मुख्य परिसराच्या दुरुस्तीसाठी पुन्हा मोठ्या निधीची गरज का भासली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सहा वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कामांची हमी संपली आहे का, त्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे निष्पन्न झाल्यास जबाबदारी कोणाची निश्चित होणार, संबंधित कामांचे तांत्रिक परीक्षण आणि लेखापरीक्षण करण्यात आले आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. जुन्या कामांची चौकशी आणि जबाबदारी निश्चित न करताच नव्या खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जात असल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

४.६५ कोटींच्या प्रस्तावात नेमके काय?
अंतर्गत सजावट : अद्ययावत सोफा सेट, आकर्षक प्रकाशव्यवस्था, फॉल्स सिलिंग आणि फरशीचे पॉलिशिंग
कलाकारांसाठी सुविधा : ड्रेसिंग टेबल, स्टोरेज कपाटे आणि विश्राम कक्षांचे आधुनिकीकरण
कार्यालयांचे नूतनीकरण : प्रशासकीय कक्ष आणि व्हीआयपी दालनांची सजावट

सुविधा सुधारणे आवश्यक
नाट्यगृहाचे सौंदर्यीकरण आणि सुविधा सुधारणे आवश्यक असले, तरी आधी केलेल्या कामांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा यांचाही विचार होणे गरजेचे आहे. सार्वजनिक पैशातून वारंवार दुरुस्तीची वेळ येत असेल, तर कामांच्या दर्जाची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक ठरते. त्यामुळे चार कोटी ६५ लाख रुपयांच्या नव्या प्रस्तावाला मंजुरी देण्यापूर्वी जुन्या कामांची चौकशी, खर्चाचे परीक्षण आणि दोषींवर कारवाई होणार का, हा कळीचा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com