

शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही!
महामार्गाच्या कामाची आमदारांकडून पाहणी
पनवेल, ता. १३ (बातमीदार) : वडोदरा-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. या वेळी त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. महामार्गाच्या विकासकामात शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महामार्गाच्या कामामुळे परिसरातील शेतजमिनी बाधित होण्याची शक्यता असून, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि शेतात जाण्या-येण्यासाठी असलेल्या रस्त्यांबाबतही समस्या निर्माण झाल्या आहेत. या अडचणींमुळे शेतीच्या कामकाजावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. महामार्गाचे काम करताना पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवावा, शेतात जाण्यासाठी योग्य मार्ग उपलब्ध करून द्यावेत आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
विकासकामांमुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि शेतीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी नमूद केले. महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करताना स्थानिकांच्या मूलभूत गरजा आणि शेतीविषयक प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
शेतकऱ्यांच्या मागण्या संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासमोर मांडून त्यावर सकारात्मक व कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले.
महामार्गामुळे दळणवळणाच्या सुविधा सुधारण्यास मदत होणार असली, तरी विकासासोबत शेतकऱ्यांचे हित जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे वेळेत निराकरण करून महामार्गाचे काम मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.