

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : निर्यातवाढ, आंतरराष्ट्रीय व्यापार, संशोधन, स्वदेशी तंत्रज्ञान आणि अवजड अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १० सदस्य कंपन्यांचा ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (टिसा) वतीने गौरव करण्यात आला. संस्थेच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुरस्कार प्रदान करून औद्योगिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेण्यात आली. टिसा हाऊस येथे झालेल्या या सभेत उद्योगांच्या समस्या आणि आगामी उपक्रमांवरही चर्चा झाली. देशाची निर्यात २०३०-३१ पर्यंत दोन ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर निर्यातदार उद्योगांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले.
जागतिक बाजारपेठेतील निर्यात आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील योगदानाबद्दल एएसपी असोसिएट्स, मेयर ऑर्गनिक्स, आकृती फार्मास्युटिकल्स, प्रिसाइज इलेक्ट्रिकल्स, मिलन लॅबोरेटरीज (इंडिया), मोतीलाल डिश्ड-एंड्स वर्क्स, कायझन एंटरप्रायझेस आणि शिंगरे इंडस्ट्रीज या आठ कंपन्यांना सन्मानित करण्यात आले. स्वदेशी तंत्रज्ञान आणि संशोधनातील कामगिरीबद्दल एस. एस. नातू प्लास्टिक्स अँड मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा गौरव झाला. बीएलडीसी आणि पीएमएसएम मोटर्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी, रोबोटिक्स आणि ड्रोनसाठी उपयुक्त मोटर तंत्रज्ञानातील योगदानाची दखल घेण्यात आली. तसेच, फिनॉल आणि ॲसिटोन प्रकल्पासाठी १२ महत्त्वपूर्ण कॉलम्स आणि प्रेशर व्हेसल्सची निर्मिती व पुरवठा केल्याबद्दल फिल्स हेवी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचा सन्मान करण्यात आला.
उद्योगांवरील नियमपालनाचा भार कमी करणे, प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याची गरजही सभेत अधोरेखित करण्यात आली. भिवंडी परिसरातील उद्योगांसाठी अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्याच्या पाठपुराव्याची एमएमआरडीएने दखल घेतल्याची माहिती देण्यात आली. या वेळी माजी अध्यक्षा सुजाता सोपारकर, उपाध्यक्ष आशीष सिरसाट, भावेश मारू आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.