

पदोन्नतीकरिता शैक्षणिक अट शिथिलतेची विशेष बाब
कार्यकारी अभियंत्याकडे अतिरिक्त शहर अभियंते पदाचा भार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ ः पालिकेच्या सर्वसाधारण महासभेत अतिरिक्त शहर अभियंता या पदावरील पदोन्नतीसाठी शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल करण्यावरून जोरदार चर्चा रंगली. या चर्चेतून लोकप्रतिनिधींचे अधिकार, प्रशासकीय परंपरा आणि महापालिकेच्या अधिकृत पत्रव्यवहाराचा मुद्दा ऐरणीवर आला. अखेर कार्यकारी अभियंते मदन वाघचौडे यांना अतिरिक्त शहर अभियंता या पदावर विशेष बाब म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी अतिरिक्त शहर अभियंता या उच्च पदासाठी शैक्षणिक अट शिथिल करण्यास विरोध दर्शवला. २०२१ मध्ये निश्चित केलेला अर्हतेचा क्रायटेरिया कायम ठेवून महापालिकेचा दर्जा अबाधित ठेवावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावर उत्तर देताना सभागृह नेते सागर नाईक यांनी स्पष्ट केले की, ही शिथिलता केवळ मदन वाघचौडे यांच्यासाठी विशेष प्रकरण (स्पेशल केस) म्हणून दिली जात असून, इतर पदोन्नतींसाठी ती लागू होणार नाही. दरम्यान, पत्रव्यवहाराच्या मुद्द्यावरून सभागृहात दोन गट पडले. महापालिकेचा अधिकृत पत्रव्यवहार आयुक्तांऐवजी सचिव, पालिका यांच्याच स्वाक्षरीने राज्य शासनाकडे गेला पाहिजे, असा आग्रह सागर नाईक, द्वारकानाथ भोईर आणि उपमहापौर दशरथ भगत यांनी धरला. महापालिका सार्वभौम असून, लोकप्रतिनिधींचा अधिकार सर्वोच्च असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तर दुसरीकडे, नगरसेवक शिवराम पाटील यांनी गेल्या २५ वर्षांच्या परंपरेचा दाखला देत आयुक्तांच्या माध्यमातूनच पत्रव्यवहार सुरू ठेवण्याची मागणी केली. गटनेते मनोज हळदणकर यांनी कर्मचाऱ्यांवरील अन्याय टाळण्यासाठी आणि रिक्त पदांवर खालील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची गरज अधोरेखित केली. अखेर महापौर सुजाता पाटील यांनी मार्च महिन्यातील ठरावाचा संदर्भ देत, महापालिकेचा अधिकृत पत्रव्यवहार सचिवांमार्फतच होईल असे निर्देश दिले. तंत्रज्ञान आणि कायद्यातील नवीन अपडेट्स स्वीकारण्याचे आवाहन करत त्यांनी उपसूचनेसहित सर्वानुमते मंजूर झाल्याची घोषणा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.