

पूर्णेकर हत्या प्रकरण
नगरसेवकपदाच्या वादातूनच हत्या?
यूपी एसटीएफकडे दोघांची कबुली; सुपारी देणारा अद्याप अस्पष्ट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागे नगरसेवकपदाच्या निवडणुकीवरून असलेले जुने वैमनस्य असल्याची कबुली अटकेतील संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंह उर्फ पपलू या दोघांनी उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलाकडे (एसटीएफ) दिल्याची माहिती मंगळवारी (ता. १३) समोर आली आहे; मात्र हत्येची सुपारी कोणी दिली, त्यासाठी आर्थिक रसद कोणी पुरवली आणि कटाचा मुख्य सूत्रधार कोण, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे आरोपींच्या अटकेनंतरही हत्येमागील सूत्रधाराचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.
संतोष कनोजिया आणि अमित सिंह या दोघांना शुक्रवारी (ता. ९) उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली. महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीवरून यूपी एसटीएफच्या प्रयागराज पथकाने ठाणे गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केली. प्रयागराजमधील नैनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अरैल सेल्फी पॉइंटजवळ सापळा रचून दोघांना सायंकाळी साडेसातच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकातून या कारवाईची माहिती देण्यात आली. नगरसेवकपदाच्या निवडणुकीवरून असलेल्या जुन्या वैमनस्यातून साथीदारांच्या मदतीने ही हत्या करण्यात आल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सुपारीचे धागेदोरे शोधण्याचे आव्हान
दोघांच्या अटकेमुळे पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे; मात्र हत्येचा कट कुठे आणि कसा रचण्यात आला, सुपारी कोणी दिली, आर्थिक व्यवहार कोणामार्फत झाले आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. अटकेतील आरोपींकडून मिळणारी माहिती आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी यांमधून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांना करावा लागणार आहे.
.....
पप्प्या शिंदेला न्यायालयीन कोठडी
हत्या प्रकरणातील आरोपी पप्प्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार यांना मंगळवारी (ता. १३) ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पप्प्या शिंदे याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, तर निखिल यादव आणि नितेश पवार यांच्या पोलिस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ केली. दरम्यान, आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. आरोपींची एकत्रित चौकशी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. गोळीबारासाठी वापरलेल्या शस्त्राची माहिती मिळवणे आणि हत्येच्या कटात प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका स्पष्ट करणे, या कारणांसाठी निखिल यादव आणि नितेश पवार यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती.
.....
राजेंद्र शिंदे यांची खंडणीविरोधी पथकाकडून चौकशी
पूर्णेकर यांच्या मुलाने आणि भावाने काही व्यक्तींविषयी संशय व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे सेनेच्या माजी महापौर तथा नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांना मंगळवारी (ता. १३) ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात बोलावून चौकशी करण्यात आली. या हत्या प्रकरणात संबंधित व्यक्तींची भूमिका काय आहे, याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.