

मेट्रो-७ अ च्या बांधकामातील
फनेल झोनचा अडथळा दूर होणार
अद्ययावत लँडिंग सिस्टीममुळे उंचीचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : एमएमआरडीएकडून उभारल्या जात असलेल्या मेट्रो-७ अ मार्गासमोर उभा राहिलेला फनेल झोनच्या उंचीचा अडथळा लवकरच दूर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पथकाने नुकतीच संभाव्य सुरक्षा धोके तपासण्यासाठी मेट्रोच्या प्रकल्पस्थळाला भेट दिली होती. तेव्हा विमानतळावर अद्ययावत इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम-२ बसवली आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिकेच्या उंचीचा विमानांच्या हालचालींना फारसा अडथळा येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्याबाबतचा अहवाल त्यांनी एआरपोर्ट अथाॅरिटी ऑफ इंडियाला (एएआय) पाठवला आहे. त्याआधारे विशेष बाब म्हणून एएआयकडून मेट्रो मार्गिकेच्या उंचीबाबत काही शिथिलता आणली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एमएमआरडीएकडून गुंदवली मेट्रो स्थानकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान मेट्रो-७ अ हा भुयारी आणि उन्नत मेट्रो मार्ग उभारला जात आहे. त्याचे सुमारे ८० टक्के काम झाले आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या उन्नत मार्गाचा एअरपोर्ट काॅलनीचा टप्पा विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येत असल्याचे समोर आल्याने प्रकल्पाच्या उंचीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएकडून विमानतळ प्राधिकरण, एएआय आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विनतळ प्राधिकरणाच्या पथकाने पहाणी केली होती. तेव्हा विमनतळावर बसवलेली अद्ययावत इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम ही एक अचूक जमिनीवर आधारित रेडिओ नेव्हिगेशन प्रणाली आहे, जी विमानाला धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरण्यासाठी क्षैतिज आणि अनुलंब मार्गदर्शन करते. या अद्ययावत यंत्रणेमुळे विमान अधिक अचूकतेने आणि लक्षणीय कमी दृश्यमानतेतही सुरक्षितपणे धावपट्टीकडे येऊ शकते असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्याबाबतचे मत त्यांनी एएआयला पाठवले असल्याने सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.